24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home क्रीडा आशियाई ‘ऑलिंपिकची आशा’ टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या आद्या बाहेतीची कांस्यपदकावर मोहोर

आशियाई ‘ऑलिंपिकची आशा’ टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या आद्या बाहेतीची कांस्यपदकावर मोहोर

0
4
; 14 पैकी 12 सामने जिंकत मिळवून दिले पदक
परभणी,दि.07(प्रतिनिधी) : कझाकस्तानमधील अलमट्टी येथे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आशियाई ऑलिंपिकची आशा’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत परभणीच्या आद्या बाहेती हिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. 14 सामन्यांपैकी तब्बल 12 सामने जिंकत आद्याने भारतासाठी पदकाची कमाई केली.
29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत आशिया खंडातील 15 देशांतील 39 अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा ‘ऑल प्ले ऑल’ पद्धतीने खेळविण्यात आली. भारताचे प्रतिनिधित्व करणार्या आद्याने सातत्यपूर्ण आणि दमदार खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
आद्याच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर, डॉ. माधव शेजुळ, जिल्हा सचिव तथा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, डॉ. विवेक नावंदर, कल्याण पोले, मिलिंद साळवे, सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, विक्रम हातेकर, पवन कदम, पीयूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते, भक्ती मुक्तावार, नागेश जोशी तसेच तिच्या पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आद्या बाहेती ही भारतीय खेळ प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार्या ‘खेलो इंडिया’ प्रशिक्षण केंद्रात टेबल टेनिसचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत असून ती परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेची खेळाडू आहे. तसेच ती स्कॉटिश अकॅडमी शाळेची विद्यार्थिनी आहे. तिच्या सरावासाठी अनिल बंदेल, सचिन पुरी, असद अली, अजय कांबळे आणि ईश्वर कदम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. तसेच फिजिओ ऐश्वर्या पाटील आणि योग प्रशिक्षक कांचन बसेकर यांचेही तिला मोलाचे सहकार्य मिळत आहे.