23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ अखेर मोरगाव–सिरोली–महागाव रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

अखेर मोरगाव–सिरोली–महागाव रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

0
6

अर्जुनी-मोरगाव.=अर्जुनी-मोरगाव–निलज–मालकनपूर–माहूरकुडा–सिरोली–महागाव–बोरी या इजिमा-१२० मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, विद्यार्थी व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या मार्गावरून एस.टी. बससेवाही बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली होती. अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी परिसरातील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती व बससेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपविभागीय अधिकारी, अर्जुनी-मोरगाव यांच्यामार्फत निवेदन दिले होते. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर तथा आमदार इंजि. राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
या मार्गावरील रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली होती की, वाहन चालविणे तर दूरच, पायदळ चालणेही कठीण झाले होते. त्यामुळे एस.टी. महामंडळाने या मार्गावरील बससेवा बंद केली होती. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत होता. रस्ता दुरुस्ती करून तातडीने बससेवा सुरू करावी, यासाठी परिसरातील नागरिकांनी विविध ठिकाणी निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या दिवशी रास्ता रोको व उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या कामाचे टेंडर अद्याप मंजूर झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीने खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू झाल्याची माहिती मिळताच संबंधित नागरिक व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. काम सुरू झाल्याने ९ ऑगस्ट रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करून बससेवा पूर्ववत न झाल्यास पुन्हा शासन व प्रशासनाकडे निवेदन देऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.यावेळी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे, नरेश खंडाईत, नंदकिशोर गहाणे, लालाजी कापगते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

blank