23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home क्रीडा ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी, मार्गदर्शन व व्यासपीठ मिळणे गरजेचे — जि.प. अध्यक्ष...

ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी, मार्गदर्शन व व्यासपीठ मिळणे गरजेचे — जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
8

अरुणनगर येथे भव्य फुटबॉल स्पर्धेला दिमाखात सुरुवात.

खुल्या व ग्रामीण विभागात तब्बल ६० संघांचा सहभाग

अर्जुनी मोरगाव, दि. 9 ऑगस्ट :युवा सांस्कृतिक तथा क्रीडा असोसिएशन, अरुणनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात करण्यात आला. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते. त्यांच्या हस्ते फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खेळाडू, क्रीडाप्रेमी, आयोजक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य स्पर्धेत खुल्या विभागात तब्बल ३२ संघांनी, तर ग्रामीण विभागात २८ संघांनी सहभाग नोंदविला आहे. अशाप्रकारे दोन्ही विभाग मिळून एकूण ६० संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे अरुणनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित खेळाडू, क्रीडाप्रेमी, आयोजक व ग्रामस्थांशी संवाद साधताना लायकराम भेंडारकर यांनी ग्रामीण भागात फुटबॉलसह विविध क्रीडा प्रकारांना अधिकाधिक वाव मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागामध्ये अनेक होतकरू, प्रतिभावान आणि मेहनती खेळाडू आहेत. मात्र, योग्य संधी, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध न झाल्यामुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अपेक्षित दिशा मिळत नाही.
अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि स्थानिक पातळीवरून जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात सातत्याने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

खुल्या विभागातील विजेत्या संघासाठी ७७ हजार ७७७ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३३ हजार ३३३ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २२ हजार २२२ रुपये अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

ग्रामीण विभागात प्रथम क्रमांकासाठी ३० हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार १ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार १ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. आकर्षक बक्षिसांमुळे खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मणिपूर,पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. तसेच महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा, यावतमाळ आदी शहरांमधूनही संघांनी सहभाग नोंदविला आहे.

काही संघांमध्ये विदेशी खेळाडूंचाही सहभाग असल्यामुळे अरुणनगर येथील या स्पर्धेला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध राज्यांतील आणि देशाबाहेरील खेळाडूंच्या सहभागामुळे स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची व त्यांच्याकडून अनुभव घेण्याची मोठी संधी मिळणार आहे.

या भव्य फुटबॉल स्पर्धेला ८ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून १५ ऑगस्ट रोजी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पुढील सात दिवस अरुणनगर परिसरात फुटबॉल सामन्यांचा थरार रंगणार असून, मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या संघांमुळे स्पर्धेत चुरस पाहायला मिळणार आहे.ग्रामीण विभागातील स्थानिक खेळाडूंना खुल्या विभागातील अनुभवी व विविध भागांतून आलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत असल्याने ही स्पर्धा त्यांच्या क्रीडा कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमाला पोर्णिमा ढेंगे सभापती महिला व बालकल्याण, जयश्री देशमुख जि.प. सदस्य,नाजुक कुंभरे पं.स. सदस्य,ज्योती कांबळे उपविभागीय अधिकारी,अनिरुद्ध कांबळे तहसीलदार ,पेंदामजी नायब तहसीलदार,मिनती किर्तुनिया सरपंच, उमाकांत ढेंगे माजी सभापती जि.प,प्राणगोपाल दास तंटामुक्ती अध्यक्ष,बाबुल बनिक माजी सरपंच,चंपा मंडल ग्रामपंचायत सदस्य, मधुकर नाकाडे, टिकाराम नाकाडे,विमल ढाली,वासुदेव गाईन अध्यक्ष सेवा सहकारी संस्था,मुरारी घोडेस्वार उपसरपंच,राजकुमार चौहान पोलीस पाटील,गुरुपद सरदार, विरेंद्र सरकार माजी पोलीस पाटील, कोहाडकरजी मुख्याध्यापक, गुरुचरण वैद्य, अनिल देशमुख,खितेश मंडल, अविन मिश्रा,संतोष ढाली, चव्हाणजी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.याशिवाय विविध संघांचे खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यामुळे संपूर्ण अरुणनगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत ६० संघ सहभागी झाल्याने अरुणनगरची ही फुटबॉल स्पर्धा परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरली आहे. गावागावातून उत्कृष्ट खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन प्राणगोपाल दास, प्रवीर बिस्वास, बाबुल बनिक , वीरेंद्र सरकार, सुजित किर्तुनिया, कलकेतु मुजुमदार, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे

blank