24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ २०२४ नंतर वारस फेरफार,खरेदी-विक्री झालेल्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अपडेट करा-आ.रहांगडालेची मागणी

२०२४ नंतर वारस फेरफार,खरेदी-विक्री झालेल्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अपडेट करा-आ.रहांगडालेची मागणी

0
6

तिरोडा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आवश्यक आहे. मात्र, सन २०२४ नंतर वारस फेरफार अथवा खरेदी-विक्रीमुळे जमिनीच्या मालकी हक्कात बदल झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप अद्ययावत झालेले नसल्याने पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय भरतभाऊ रहांगडाले यांनी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
सन २०२४ नंतर वारस फेरफार अथवा खरेदी-विक्री झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीप्रमाणे त्यांचे फार्मर आयडी तातडीने अपडेट करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आवश्यक आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार रहांगडाले यांनी केली आहे.
फार्मर आयडी अद्ययावत झाल्यास कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे आमदार रहांगडाले यांनी नमूद केले.शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल विभागाने तातडीने कार्यवाही करून फार्मर आयडी अद्ययावत करण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी त्यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

blank