-विद्यापीठात एक दिवसीय परिणाम-आधारित मूल्यांकन, प्राप्ती, गणना आणि सर्वोत्तम कार्यपद्धती कार्यशाळा
नागपूर :ध्येय्याभिमुख शिक्षणातून (Outcome based Education) विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान मिळावे, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा (आयक्यूएसी) च्या वतीने गणित विभागातील श्रीनिवास रामानुजन सभागृहात ‘परिणाम-आधारित मूल्यांकन, प्राप्ती, गणना आणि सर्वोत्तम कार्यपद्धती’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा बुधवार, दि.१२ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात बीजभाषण करताना कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी भूषविले तर तज्ञ व्यक्ती म्हणून मरियन कॉलेज कुट्टीक्कनम येथील एमसीए प्रोग्राम संचालक तथा आयपीएसआर सोल्युशन्स लिमिटेडचे सीईओ डॉ. मेंडस जेकब, विद्यापीठाचे आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे आणि गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार यांची उपस्थिती होती. अभियांत्रिकी, नाविन्यपूर्ण अथवा पारंपारिक शिक्षण असो, शिक्षक म्हणून आपल्या संबंधित विषयांचा अभ्यासक्रम तसेच संकल्पना स्पष्ट असायला हव्यात, असे डॉ. मनाली क्षीरसागर यांनी पुढे बोलताना सांगितले. शिक्षकांनी विषय स्वतःहून शिकायला हवे. विद्यार्थ्यांना करियरमध्ये ज्ञानाचा वापर करणे उपयोगात येईल, असा अभ्यासक्रम असणे अपेक्षित आहे. ध्येयाभिमुख शिक्षण (OBE) रॉकेट सायन्स नसून मूलभूत प्रात्यक्षिकावर आधारित तसेच जीवन कौशल्यावर आधारित असणे गरजेचे आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान घेतलेल्या ज्ञानाचा वापर करता येणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे जीवन कौशल्याचे शिक्षण देणारे वेगळेपण पदवी शिक्षणात असावे, असे कुलगुरू म्हणाल्या. उद्योगांना अपेक्षित असलेले कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आवश्यक असल्याने उद्योजकांना अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी करून घेणे गरजेचे आहे. शिक्षकांनी संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने आगामी पाच वर्षातील व्हिजन, मिशन तसेच ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. दृष्टीकोन ठरलेला असेल तर मिशन मोडवर ध्येय प्राप्त करता येते, असे कुलगुरू म्हणाल्या. ज्ञानाची मोठी परंपरा आपणास लाभलेली आहे. संपूर्ण जगाला भारताने ज्ञान दिले असून शून्य तसेच आयुर्वेदाची मोठी देण भारताने जगाला दिली आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना एकत्रित प्रयत्नातून कशाप्रकारे प्रात्यक्षिकातून ज्ञान प्राप्त होत होतो, याची माहिती विविध उदाहरणांच्या माध्यमातून कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी दिली. आपण शिकवतो, मात्र, विद्यार्थी शिकतात का? असा प्रश्न उपस्थित करीत येथून विचारांची सुरुवात होते, असे कुलगुरू म्हणाल्या. नारायण मूर्ती यांच्या म्हैसूर इन्फोसिस येथील निवासी शैक्षणिक प्रशिक्षण सुविधा केंद्राची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविक करताना आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य हे विद्यापीठाचे भविष्य असून पारंपारिक शिक्षणातून विद्यार्थ्यांना असंख्य करियरच्या संधी उपलब्ध होतात, असे सांगितले. उच्च शिक्षण, संशोधन, शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध प्रकारचे यश संपादन करण्याची क्षमता पारंपारिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून शिक्षकांनी अधिक मंथन करीत अशा प्रकारे ध्येयाभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षण, तंत्रज्ञान बदलत असताना विद्यार्थी यासाठी तयार असावा याकरिता ६ प्रकारच्या शैक्षणिक पातळी निर्माण करण्याची शिक्षकांची जबाबदारी असून याबाबत अधिक माहिती प्राप्त व्हावी याकरिता या कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
*ध्येयाभिमुख शिक्षणावर मार्गदर्शन*
मरियन कॉलेज कुट्टीक्कनम येथील एमसीए प्रोग्राम संचालक तथा आयपीएसआर सोल्युशन्स लिमिटेडचे सीईओ डॉ. मेंडस जेकब यांनी ध्येयाभिमुख शिक्षणावर (OBE) कार्यशाळेत आयोजित विविध सत्रात मार्गदर्शन केले. उच्च शिक्षण घेत बाहेर पडलेल्या पदवीधारकांची सद्यस्थिती यावेळी त्यांनी सांगितली.ध्येयाभिमुख शिक्षण पद्धती योग्य प्रकारे अमलात आणल्यास पदवीधारकांना रोजगार प्राप्त होत शैक्षणिक गुणवत्ता वाढवता येईल असे डॉ. जेकब यांनी सांगितले. कार्यशाळेत डॉ. जेकब यांनी लर्निंग डोमेन- ब्लूम्स टेक्झोनाॅमी, आर्किटेक्चर ऑफ ओबीई, डिझाईन अँड मॅपिंग ऑफ ऑउटकम्स, अटेंडमेंट कॅल्क्युलेशन अँड यूसफुल ॲनालिटिक्स फॉर ॲक्रिडिएशन, बेस्ट प्रॅक्टिस अँड इनोव्हेटिव्ह आयसीटी टूल्स अँड एआय प्लॅटफॉर्म फॉर ओबीई इम्प्लिमेंटेशन, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार डॉ. समया हुमणे यांनी मानले. कार्यशाळेला विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आयक्यूएसी विभागातील विद्या फटिंग, श्री. अनिकेत गभणे, शिल्पा करवाडे, धनराज मडावी, श्रेयश माने, अंजली सिंग यांनी सहकार्य केले.





