गोंदिया। पर्यावरण संवर्धन व परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने बम्लेश्वरी कॉलनी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कॉलनीतील नागरिकांसह नव्य नेचर केअर फाउंडेशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध रोपांची लागवड केली.
यावेळी बम्लेश्वरी कॉलनीच्या वतीने श्री गिरवार, प्रमेश झा, विनायक बोरकर, सतीश अग्रवाल, विनोद चांदवानी (गुड्डू), कविता प्रिथयानी, चंदादेवी खटवानी, सरिता अग्रवाल (गुरु कृपा), सक्षम अग्रवाल, आरोही अग्रवाल, कान्हा अग्रवाल व तिथी अग्रवाल यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
तसेच नव्य नेचर केअर फाउंडेशनच्या वतीने विक्की भैया सहारे, पीनल पटेल, पंकज नंदनवार, रजत चतुर्वेदी, चिराग बावनथडे, जितेंद्र भरणे, दीपक अनवानी, युगल सोनी, अशोक कावळे, अजित शेनमारे, साहिल वधवानी व जितेंद्र बोकडे यांच्यासह इतर सदस्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमात विशेषतः कडुनिंब, मोरिंगा (शेवगा) तसेच पर्यावरण आणि मानवी जीवनासाठी उपयुक्त व प्राणवायू देणाऱ्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. कॉलनीमध्ये हिरवाई वाढण्यासोबतच भविष्यात स्वच्छ व शुद्ध वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या वृक्षांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्वांनी लावलेल्या रोपांची नियमित देखभाल व संवर्धन करण्याचा संकल्प केला. उपस्थितांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नसून, लावलेल्या रोपांची वृक्ष होईपर्यंत योग्य निगा राखणे तितकेच आवश्यक आहे.जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केल्यास येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ, निरोगी आणि हिरवेगार वातावरण निर्माण करता येईल. यावेळी नागरिकांना आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.





