24.2 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ खांबी-शिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना १ सप्टेंबरपासून बंद होण्याची शक्यता

खांबी-शिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना १ सप्टेंबरपासून बंद होण्याची शक्यता

0
5

 ३० गावांवर पाणीटंचाईचे संकट; जिल्हा परिषदेने तातडीने तोडगा काढण्याची मागणी 
अर्जुनी मोर.– तालुक्यातील खांबी व शिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १९ वर्षांपासून शासनाच्या कोणत्याही नियमित अनुदानाशिवाय पाणीपुरवठा मंडळांच्या माध्यमातून सुरू आहेत. या दोन्ही योजनांमधून परिसरातील सुमारे ३० गावांना नियमित पाणीपुरवठा केला जात असून, नागरिकांकडून मासिक वर्गणी जमा करून योजनांचा खर्च भागविला जात आहे. मात्र वाढते विद्युत बिल, देखभाल-दुरुस्तीचा खर्च आणि अन्य प्रशासकीय खर्चामुळे मागील दोन वर्षांपासून या योजना मोठ्या आर्थिक तोट्यात सुरू आहेत.
सध्या प्रत्येक ग्राहकाकडून दरमहा २०० रुपये वर्गणी घेतली जात असतानाही योजनांचा खर्च भागत नसून दोन्ही योजनांवर मिळून मोठ्या प्रमाणात आर्थिक तूट निर्माण झाली आहे. मागील वर्षी मार्च २०२५ मध्ये आर्थिक तोट्यामुळे या योजना बंद करण्याचा निर्णय पाणीपुरवठा मंडळाने घेतला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी मध्यस्थी करून योजनांच्या संचालनामुळे निर्माण होणारी तूट जिल्हा परिषदेकडून भरून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळांनी जनहिताचा विचार करून योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
मात्र, त्यानंतर अद्याप जिल्हा परिषदेकडून कोणतीही आर्थिक तूट भरून देण्यात आलेली नसल्याने योजनांवरील थकबाकी वाढत गेली आहे. सध्या दोन्ही योजना अंदाजे २० ते २५ लाख रुपयांच्या आर्थिक तोट्यात सुरू असून विद्युत वितरण कंपनीचे वीज बिलही मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे. थकीत वीज बिलामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस संबंधित पाणीपुरवठा मंडळांना प्राप्त झाली आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे येत्या १ सप्टेंबर २०२६ पासून खांबी व शिरेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय पाणीपुरवठा मंडळांनी घेतला आहे. योजना बंद झाल्यास परिसरातील सुमारे ३० गावांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सुजल सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष किशोर तरोणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये १ सप्टेंबरपासून योजना बंद झाल्यास निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारावी, तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने आर्थिक व प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
तसेच भविष्यात या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पाणीपुरवठा धोरण २०२६ नुसार सक्षम पद्धतीने चालविण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक निधी व कायमस्वरूपी आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना सुजल सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष किशोर तरोणे, शिरेगाव पाणीपुरवठा मंडळाचे सचिव नीलकंठ बोरकर व सुजल संस्थेचे सचिव कालिदास पुस्तोळे उपस्थित होते.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित अधिकारी व पाणीपुरवठा मंडळांची तातडीने बैठक बोलावून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ३० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आता कोणता निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

blank