25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ त्या विद्यार्थीनीच्या हाकेला,जिल्हा प्रशासनाची तत्पर साद;खेतापूर-नागपूर बससेवा सुरु

त्या विद्यार्थीनीच्या हाकेला,जिल्हा प्रशासनाची तत्पर साद;खेतापूर-नागपूर बससेवा सुरु

0
16
****जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डोंगरगाव येथे जाऊन विद्यार्थीनींशी साधला संवाद
नागपूर,दि. 14 : कुही तालुक्यातील खेतापूर हे दुर्गम क्षेत्रातील छाटेसे गाव. येथील मुली माध्यमिक शिक्षणासाठी 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे जाणे-येणे करतात. एसटी बसची सुविधा नसल्याने इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या टीना वैकुंठे या विद्यार्थीनीने आपली व्यथा सामाजिक माध्यमांवर व्यक्त केली. गावाची एकूण परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तत्पर धाव घेऊन थेट खेतापूर गाठले. टीना व तिच्या सोबत शिकणाऱ्या गावातील मुलींशी त्यांनी थेट संवाद साधून बस समवेत इतरही अडचणी समजून घेतल्या. भेटी दरम्यानच त्यांनी राज्य परिवहन महामंडळाला सांगून लगेच खेतापूर ते नागपूर अशा एसटी बसचा टीनासह मैत्रिणींच्या हस्ते शुभारंभ करुन प्रशासनाच्या तत्परतेचा प्रत्यय दिला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गावाला प्रत्यक्ष भेटीत इतरही प्रश्न गावकऱ्यांकडून समजून घेतले. खेतापूर ते डोंगरगाव रस्ता दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेऊन येत्या सप्टेंबर महिन्यापासून हे काम सुरु करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सदर काम अमृतकाल योजनेंतर्गत समाविष्ट करण्याचेही त्यांनी सांगितले. एसटी बसच्या सुविधेसमवेत नागपूर महानगर पालिकेच्या बस सुविधेचाही खेतापूर गावाला सुविधा मिळण्याबाबत प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.
गावातील गोपाळ समाजाचे झुडपी जंगल जमिनीवर असलेले अतिक्रमण न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमाकुल करणे, पाळीव जनावरांवर होणारे वाघांचे हल्ले कमी करण्यासाठी वन विभागामार्फत नियोजन या बाबतही त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. यावेळी आमदार डॉ संजय मेश्राम, तहसिलदार अमित घाडगे, सरपंच प्रदीप खोब्रागडे व ग्रामस्थ उपस्थित होते.