गोंदिया:शहर पोलिसांच्या गस्ती पथकाने १३ ऑगस्ट रोजी मडी चौक परिसरात केलेल्या धडक कारवाईत दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ५ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सखोल चौकशीत हा मुद्देमाल मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एका घरात दरोडा टाकून आणल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानंतर गोंदिया पोलिसांनी बालाघाट पोलिसांशी संपर्क साधून पुढील कारवाईसाठी सातही आरोपींना त्यांच्या हवाली केले आहे.
गस्तीदरम्यान कारवाई आणि मुद्देमाल जप्त
शहर पोलिस ठाण्याचे पथक मडी चौक परिसरात गस्त घालत असताना सूर्याटोला येथील किसन उर्फ डेनी कमल अजित (३५) आणि कुंभारेनगर येथील मयंक केशव मनोठे (२३) हे संशयितरित्या आढळले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातील झुमके, लहान मुलांचे सोन्याचे कडे, सोन्याची साखळी, सोन्याचे मणी, नथ, कंबरपट्टा तसेच चांदीच्या पायाळू, लहान मुलांचे पैंजण व जोडवी असा एकूण ३.९४ लाखांचा ऐवज आणि १.४५ लाखांची रोकड मिळून आली. जप्त केलेल्या मालाबाबत दोघांनाही समाधानकारक उत्तर देता आले नाही.
मध्य प्रदेशात दरोडा टाकल्याची कबुली
पोलिसांनी अधिक पोलिसी हिसका दाखवून चौकशी केली असता, त्यांनी इतर पाच साथीदारांच्या मदतीने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एका घरात दरोडा टाकल्याचे कबूल केले. यात:राज उर्फ चिट्टा ओंकार लहरे (२४),दर्शन सुनील जगने (२१),मयूर संजय गजापुरे (२३),प्रणय देवेंद्र मेश्राम (२०),शुभम विठ्ठल गंधे (२५)या सर्वांच्या मदतीने दरोडा टाकल्याची माहिती समोर आली.
आरोपी बालाघाट पोलिसांच्या हवाली
माहिती मिळताच गोंदिया शहर पोलिसांनी बालाघाट पोलिसांशी संपर्क साधला. बालाघाटचे पोलिस निरीक्षक कामेशकुमार धुमकेती यांनी आपल्या हद्दीत दरोड्याची घटना घडल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. त्यानंतर पोलिस निरीक्षक धुमकेती आणि फिर्यादीला गोंदिया येथे पाचारण करण्यात आले. फिर्यादीने संशयितांची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी साताही आरोपींना पुढील तपास व कारवाईसाठी बालाघाट पोलिसांच्या ताब्यात दिले.ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे प्रभारी प्रवीण बोरकुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मडावी तसेच डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.





