जलजीवन, आरोग्य व पशुसंवर्धन विभागाच्या कारभारावर नाराजी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
अर्जुनी मोरगाव, दि. 19ऑगस्ट : बोंडगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकासकामे आणि शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंजोरी येथे मंगळवारी व्यापक आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शिक्षण, पंचायत, महिला व बालकल्याण, आरोग्य, कृषी, जलजीवन मिशन, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, बांधकाम, जलसंधारण, महसूल, वन विभाग तसेच ‘उमेद’ अभियानासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
सभेत प्रलंबित विकासकामे, कामांचा दर्जा, लाभार्थी निवडीतील तक्रारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता करण्यात येणाऱ्या कामांचा मुद्दा गाजला. विशेषतः जलजीवन मिशन, आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजावर अध्यक्ष भेंडारकर यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मंजूर व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून विकासकामांमध्ये पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जलजीवन मिशनच्या काही कामांचा दर्जा व अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या बैठकीतील अनुपस्थिती यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही कामांमध्ये ठेकेदारांशी संगनमत करून स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही सभेत करण्यात आला. आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाची स्थानिक लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याबद्दल अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.पशुसंवर्धन विभागाच्या आढाव्यात काही लाभार्थ्यांनी थेट सभेत तक्रारी मांडल्या. ठेकेदारांच्या माध्यमातून जनावरे दिली जात असल्याचा तसेच प्रत्यक्ष पशुपालक व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. गोठा योजनेतील लाभार्थी निवडीवरही प्रश्न उपस्थित झाले. पात्र व गरजू लाभार्थ्यांपर्यंतच योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात शिक्षकांची रिक्त पदे, शाळांमधील बांधकामे व मूलभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. पंचायत विभागात पांदण रस्त्यांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महिला व बालकल्याण, कृषी, बांधकाम, महसूल, वन, जलसंधारण आणि ‘उमेद’ अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध कामे व योजनांचाही आढावा घेण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या तैलचित्रांचे पूजन व माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
सभेला पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, प्रकल्प संचालक प्रमिला जाखडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी टीटमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मधुकर वासनिक, विजय लोंढे, शिक्षणाधिकारी पवन खंडारे, गटविकास अधिकारी पल्लवी बाडेकर, तालुका कृषी अधिकारी सुलोचना पाथोडे, कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी अभिजीत गोल्हार, कार्यकारी अभियंता प्रकाश ताकसांडे, अजिंक्य वानखेडे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुकन्या कांबळे, ‘उमेद’चे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र रहांगडाले यांच्यासह महसूल विभाग, वन विभाग व अन्य विभागांचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, स्थानिक पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कागदावरील अहवालापेक्षा प्रत्यक्ष कामांना प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी कडक भूमिका अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी घेतल्याने बोंडगाव देवी येथील ही आढावा सभा चर्चेचा विषय ठरली.





