नागपूर,दि.09 : राज्यघटनेने दिलेले घटनात्मक अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी ओबीसी समाजाची आकडेवारी जाहीर करून केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे.असैवधानिक असलेली क्रिमिलेयरची अट रद्द करण्यात यावे आणि शेतकरी शेतमजुरांना वयाच्या 60 व्या वर्षापासून पेंशन लागू करणे या मुख्य मागणीला घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात गुरुवारी विधानभवनावर लाखोच्या संख्येत उपस्थित ओबीसी बांधवांनी हुंकार भरला.दरम्यान महाराष्ट्र सरकारच्यावतीने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व महादेव जानकर यांनी या मोर्चाला सामोरे जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यासोबत बैठक लावून मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली.दीक्षाभूमी येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महांसघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे व डॉ. खुशाल बोपचे यांनी केले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर,शरद वानखेडे,मनोज चव्हाण,गुनेश्वर आरीकर,खेमेंद्र कटरे,बबनराव फंड,सुषमा भड,बबलू कटरे,प्रा.शेषराव येलेकर,डाॅ.अजय तुमसरे,जिवन लंजे,विनय डहाके,विजय पिंदुरकर,सुनिल मालपे,संजय पन्नासे,नाना लोखंडे,नागेश चौधऱी,सुशीलाताई मोराळे,क्रिष्णा देवासे,विजय तपाडकर,विनोद उलीपवार,शुभांगी मेश्राम,छाया चव्हाण,लिलाधर पाथोडे,दुलीचंद बुध्दे,होमराज कापगते,गोविंद वरवाडे,संजय भिलकर,श्रावण फरकाडे आदी यांनी मोर्च्यात सहनेतृत्व केले.विदर्भातील सर्वच जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.विशेष म्हणजे गोंदिया.चंद्रपूर,गडचिरोली व भंडारा या चार जिल्ह्यातूनच सर्वाधिक मोर्चेकरी सहभागी होते.या चारही जिल्ह्यातील ओबीसी अधिकारी कर्मचारी मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते.या मोर्च्याला राजकीय वळण देण्याचा काही प्रयत्न झाला परंतु मोर्चेकरांनी त्यांना स्थान दिले नाही,यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचेच नेतृत्व गैरराजकीय असल्याचे सांगत तुम्ही काय केले असा उपरोधिक टोला हाणला.
मोर्च्याची सुरवात दिक्षाभूमीस्थित भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.मोर्चात खा. नाना पटोले,आ.रवी राणा आ. सुनील केदार, आ. परिणय फुके,माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आ. सेवक वाघाये,अनंतराव घरड प्रामुख्याने उपस्थित होते. ‘मी ओबीसी’ लिहिलेली पिवळी टोपी, पिवळा दुप्पटा आणि हाती पिवळा झेंडा घेतलेले हजारो ओबीसी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. ‘जय ओबीसी’च्या निनादात निघालेला हा मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मॉरिस कॉलेज टी पॉर्इंटवर या मोर्चाला थांबविण्यात आले. यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले
५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे 
प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही ओबीसी समाज आपल्या हक्कापासून दूर आहे. ५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाची जातिनिहाय आकडेवारी जाहीर करून ओबीसी समाजासाठी केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हायला हवे. मंडल आयोग, नच्चीपन आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हायलाच हव्यात. या मागण्या आता आम्ही रेटून धरणार आहोत. कारण, ओबीसी समाज जागा झाला आहे. तो कुठल्या भूलथापाना बळी पडणार नाही. ही लढाई हक्काची झाली आहे असा इशाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला.

६९ वर्षानंतरही ओबीसी समाज हक्कापासून वंचित
माॅरिस काँलेज टि पाईंटवर झालेल्या सभेत ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक डाॅ.खुशाल बोपचे यांनी विचार व्यक्त करतांना भारतीय राज्यघटनेच्या ३४० व्या कलमानुसार ओबीसींना त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही ओबीसी समाज आपल्या संवैधानिक हक्कापासून वंचित आहे. राष्ट्रीय ओबीसी मंडल आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार व केंद्र शासनाने मान्य केल्यानुसार देशातील सर्वधर्मसमावेशक ५२ टक्के ओबीसी वर्गासाठी सरकारी नोकरीत व शिक्षणात २७ टक्के आरक्षण लागू केले आहे.मात्र प्रत्यक्षात आम्हाला शुन्य टक्के आरक्षण असल्याचे पटवून दिले.
गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी ओबीसी समाजाच्या विकासाला आडकाठी घालण्याचे काम सातत्याने राज्य व केंद्रातील सरकारांनी केले असून आम्ही समाजासाठी काम करीत आहोत कुणी नेत्यासाठी नव्हे असे सांगत आमच्या ओबीसीना १०० टक्के शिष्यवृत्ती व फ्रिशीपची योजना लागू आहे. परंतु यापासून अद्यापही ओबीसी समाज वंचित आहे.शिष्यवृत्ती न मिळाल्याने आमचा ओबीसी विद्यार्थी लोकेश येरणेेला जीव गमवावा लागला तर 2154 कोटी रुपयाची शिष्यवृत्तीची रक्कम सामाजिक न्याय विभागाच्याचुकीमूळे परत गेल्याचे सांगत सध्याचे सरकाही कसे ओबीसी विरोधी आहे पटवून देत आपल्या हक्कासाठी एकत्र या व नेतृत्व कणखर करा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे डाॅ.अजय तुमसरे यांनीही सरकारला धारेवर धरीत आमच्या ओबीसींच्या नावावर राजकारण करणारे हे सरकार आमची जनगणना जाहीर का करीत नाही,शेतकर्याना योग्य मोबदला का देत नाही अशाप्रकारे टिका केली.
यावेळी खासदार नाना पटोले यांनी आपण जेव्हापासून या चळवळीशी जोडले गेलो तेव्हापासून सातत्याने ओबीसी समाजाचे प्रश्न विधीमंडळातच नव्हे तर संसदेंत सुध्दा मांडले आहेत.शिष्यवृत्तीचा प्रश्न असो की आरक्षणाचा आपण आवाज उठविला असून आपल्यासाठी जोपर्यंत स्वतंत्र मंत्रालय सरकार सुरु करणार नाही,तोपर्ंयत आपला विकास होऊ शकत नाही असे सांगत सध्या ज्या सामाजिक न्याय विभागाकडे आपला समाज आहे तो विभाग आमच्या कामाचा नसल्याचे सांगितले.
‘वरना खुर्ची खाली करो’
खा. नाना पटोले यांचे भाषण सुरू असताना ‘ओबीसी को न्याय दो, वरना खुर्ची खाली करो’ अशा घोषणा होऊ लागल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाकर्त्यांना इतरांनी समजावल्यानंतर पुन्हा भाषणाला सुरूवात झाली. परंतु त्यांच्या भाषणात घोषणा सुरूच होत्या.पटोलेना यावेळी जनतेेने मात्र कृती सांगा गोष्टा नको असा आवाज देत खुप झाले कधी राजीनामा देताय इथपर्यंत आपल्या भावना व्य्क्त केल्या.
मुख्यमंत्र्यासोबत महासंघाची बैठक घडवू-ना.फुंडकर
मागण्यांचे निवेदन स्वीकारताना कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, सरकारच्यावतीने मोर्चाला सामोरे जात असलोतरी सुरुवातीपासून ओबीसीचे नेतृत्व करीत आलो आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, आमदार यांना एकत्र आणून मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या जातील आणि त्या तडीस नेऊ असा विश्वासही त्यांनी दिला. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेवराव जानकर यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्याच्या बैठकीत मागण्या लावून धरू, असे आश्वासन दिले.
जानकर पुन्हा अडचणीत
दोन दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या मोर्चात पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेवराव जानकर यांनी एका कार्यकर्त्यावर हात उगारला होता. हे प्रकरण चांगलेच तापले होते. ते शांत होत नाही, तोच ओबीसींच्या मोर्चात त्यांना पुन्हा एका अडचणीला सामोर जावे लागले. मोर्चाच्या मंचाकडे जात असताना माजी आमदार सेवक वाघाये,गिरीश पांडव यांनी त्यांना रोखले. ‘तुम्ही धनगरांचे भले केले नाही, ओबीसींचे काय करणार’, असा थेट प्रश्न विचारला. यामुळे काहीवेळेसाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.मंचावरुनही अजय तुमसरेंनी त्यांना तुम्ही धनगरांचे प्रश्न सोडवू शकले नाही आमचे काय सोडविणार अशी टिका केली.





