संगणक शिक्षकांवर लाठीचार्ज

0
16

नागपूर : संगणक शिक्षकांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटनेतर्फे शरद संसारे व जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चावर मंगळवारी दुपारी पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला करून वरुणद्वारे पाण्याचा मारा केला. या लाठीहल्ल्यामुळे श्रीमोहिनी मोर्चा पॉर्इंट परिसरात खळबळ उडाली. लाठीहल्ल्यात २० आंदोलक जखमी झाले, तर एक युवती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करावी, यावर शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. अटक केलेल्या मोर्चेकऱ्यांची आमदार विक्रम काळे, आमदार दत्ता सावंत, राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, उमेश डडमल यांनी भेट घेतली.

महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटनेतर्फे सोमवारी विधानभवनावर संगणक शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. परंतु काहीच ठोस निर्णय झाला नसल्याने त्यांनी मोर्चास्थळी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी दुपारी संगणक शिक्षक आक्रमक झाले. त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मोर्चास्थळी बोलविण्याची जोरदार मागणी केली.

परंतु सुरुवातीला प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. अखेर दुपारी २ वाजताच्या सुमारास पाच जणांचे शिष्टमंडळ शिक्षणमंत्र्यांना भेटण्यासाठी विधानभवनात पाठविण्यात आले. परंतु शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विमानतळावर पोहोचले होते. त्यांनी शिष्टमंडळाला विमानतळावर बोलविले. परंतु शिष्टमंडळातील सदस्य विमानतळावर जाण्यास तयार नव्हते.

त्यांनी शिक्षण सचिवांची भेट घेण्याची मागणी केली. परंतु ते सुद्धा उपलब्ध नव्हते. अखेर शिष्टमंडळ कोणतेही आश्वासन न मिळताच परतले. काहीच तोडगा न निघाल्यामुळे आंदोलनकर्ते संतापले. त्यांनी बॅरिकेडस् तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा करून त्यांना मोर्चास्थळावरून पळविले.त्यांच्यावर जोरदार लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्जपासून बचाव करण्यासाठी आंदोलनकर्ते बँक आॅफ इंडिया, सेंट जोसेफ कॉन्व्हेंटकडे पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना लाठ्यांनी मारणे सुरू केले.सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या गेटसमोर जवळपास १०० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. लाठीहल्ल्यात जवळपास २० आंदोलनकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे.