जिल्ह्यात १७ हजार १७४ हेक्टरमध्ये रबीची लागवड

0
10

गोंदिया : जिल्ह्यात रबीच्या पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ६६० हेक्टर असून १७ हजार १७४ हेक्टरमध्ये रबी हंगामातील विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील एकूण ३८ हजार ९५६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यासाठी तीन कोटी १३ हजार ५३३ रूपये एवढ्या रकमेचा विमा हप्ता भरण्यात आला. यापैकी कर्जदार ३८ हजार ८४३ शेतकऱ्यांचा समावेश असून कर्जदार शेतकऱ्यांनी दोन कोटी ९८ लाख ९० हजार ०८२ रूपयांचा विमा हप्ता भरलेला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांमध्ये ११३ शेतकरी असून त्यांनी एक लाख २३ हजार ४५१ रूपयांचा विमा हप्ता भरला.

सध्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हवा तेवढा नफा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता रबी हंगामातील पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. जिल्ह्यात गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन हजार २८३ असून आतापर्यंत प्रत्यक्ष पेरणी ६७३ हेक्टर क्षेत्रात झालेली आहे. तर मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २२६ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी २७ हेक्टरमध्ये झाली आहे.

इतर तृणधान्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्र शून्य हेक्टर असले तरी १५ हेक्टरमध्ये तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र चार हजार ४७५ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी तीन हजार ६४६ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. लाखोळीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ हजार ३०४ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी आठ हजार ३०६ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. जवस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ९९१ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी चार हजार ३५२ हेक्टरमध्ये करण्यात आली. तीळाचे सर्वसाधारण क्षेत्र ३५ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी २७ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे.

सूर्यफुलांचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हेक्टर असून यंदा सूर्यफुलांची कुठेही लागवड करण्यात आली नाही. तर इतर गळीत पिकांची प्रत्यक्ष पेरणी ११७ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे. वाल, वाटाणा, पोपट, चवळी, उळीद आदी इतर कडधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र शून्य असताना प्रत्यक्ष पेरणी एक हजार ३७० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे.

यावर्षी कृषी विभागाच्या वतीने उळीदाच्या पिकाचे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरमध्ये वाढीव विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे. सर्वच तालुक्यातील पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर उन्हाळी धानपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ५०० हेक्टर असून १२ हजार हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत उन्हाळी धानपिकांची नर्सरी घालण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी विभागातून सांगण्यात आले आहे.