गडचिरोली दि.14: गोंडवाना विद्यापीठाच्या चतुर्थ दीक्षान्त समारंभात ८ विद्यार्थ्यांना पीएच.डी (आचार्य) पदवीने तर २४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर, मेघालयचे माजी राज्यपाल रणजित मुशाहरी, अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, कुलसचिव दीपक जुनघरे, विधीसभा व व्यवस्थापन परिषद तथा विद्वत परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ८ विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. यात शिक्षणशास्त्रामधून १, विज्ञानातून ६, समाजविज्ञानातून एका विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर २४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान केले असल्याचे त्यांनी सांगितले.गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विशेष करून पदव्युत्तर शिक्षणासाठी नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये आगामी सत्रापासून २0 टक्के जागा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. महामहिम राज्यपाल यांनी सुरू केलेल्या राज्यस्तरीय संशोधन उत्सव अविष्कार २0१८ तसेच राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य २0१९ आयोजित करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाला यजमानपद बहाल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या समारंभात हिवाळी २0१५ व उन्हाळी २0१६ च्या पदवी व पदव्युत्तर तसेच पदविका परीक्षेत उत्तीर्ण एकूण १२ हजार ३५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व दानदात्यांकडून विविध अभ्यासक्रमांना घोषित करण्यात आलेले २४ सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. सुवर्णपदक मिळविणार्या विद्यार्थ्यांमध्ये संध्या देवराव खेवले, अस्मिता दिलीप कोथेवार, श्यामप्रिया नामदेव मडावी, दीक्षा विठ्ठल गायकवाड, सुभद्रा धनवंत खोब्रागडे, प्रतिक्षा दिलीप कामडे, मोनाली भैय्या तामगाडे, अंकित शरदकुमार गुप्ता, ज्योती हरिचंद्र झुरे, सविता धर्मराव बन्सोड, प्रियंका भोरेलाल करूनाकर, कोमल दिलीप धनके, सीमा अंबादास कोसे, प्रियंका मंगलदास वंजारी, शेख नुरसाबानो इस्लामुद्दीन, जनार्धन शंकर पेरगुवार, रिया मुकेश जैन, दिगांबर श्रीहरी शेंडे, तृप्ती श्रीकृष्ण श्रीरामे यांचा समावेश आहे.





