गोंदिया/भंडारा/गडचिरोली,दि.22 :गोंदिया,गडचिरोली व भंडारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भारतीय विधी आयोगाव्दारे अधिवक्ता अधिनियम १९६१ मध्ये प्रस्तावित संशोधनाच्या विरोधात शुक्रवारी (दि.२१) न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून प्रस्तावित संशोधनाची न्यायालय परिसरात होळी केली.
भारतीय विधी आयोगाव्दारे २३ मार्च २०१६ रोजी विद्यमान अॅडव्होकेट अॅक्टमध्ये प्रस्तावित संशोधन करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले. या प्रस्तावित संशोधनात वकीलांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याने या संशोधनाला संपूर्ण देशातील वकीलांनी विरोध केला आहे. १६ एप्रिल रोजी मुंबई व गोवा येथील विधीतज्ञ परिषदेत या प्रस्तावित संशोधनाच्या विरोधात आंदोलन करून संशोधनाची न्यायालय परिसरात होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याअंतर्गत गोंदिया जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. टी.बी.कटरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील वकीलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून प्रस्तावित संशोधनाची होळी केली. दरम्यान, निषेध व मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. एस.पी.पिंचा, सचिव अॅड. आर.जी. राय, अॅड. एम.एस.बन्सोड, अॅड. व्ही.एम. चुटे आदी उपस्थित होते. भंडारा येथेही भंडारा जिल्हा बार असो.च्यावतीने प्रस्तावित बिलाची होळी करुन कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला.
२५ एप्रिलपर्यंत स्थानिक खासदारांना निवेदन देऊन संबंधित अधिनियम वकील मंडळींवर कसे अन्यायकारक आहे ते समजावून देणे इत्यादी मार्गांनी विरोध करण्याचे आवाहन देशभरातील वकिलांना केले होते. त्याअनुषंगाने गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयापुढे जिल्हा बार कॉन्सीलने अधिवक्ता अधिनियम १९६१ च्या प्रस्तावित दुरुस्तीची प्रत जाळून निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले.गडचिरोली येथे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद बोरावार, सचिव श्री.देशमुख, अॅड.सचिन कुंभारे, अॅड.कविता मोहरकर, अॅड.दोनाडकर यांच्यासह वकील मंडळी मोठ्या संख्येने हजर होती. तर अहेरी येथेही अधिनियमाच्या प्रती जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. अहेरी तालुका बार असोसिएशनचे सचिव अॅड.आर.एम.मेंगनवार, अॅड.उदय गलबले, अॅड.संघरत्न कुंभारे, अॅड.सतीश जैनवार आदींनी निषेध करुन न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला.





