37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ ५०० रुपयांची लाच घेताना तलाठ्यासह इसमाला अटक

५०० रुपयांची लाच घेताना तलाठ्यासह इसमाला अटक

0
26

blank

भंडारा,दि.25 : सातबाऱ्यावर १ लक्ष रुपयांचा बोझा चढविण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यासह एका इसमाला रंगेहात पकडण्यात आले. मुरलीधर शेंडे असे या तलाठ्याचे नाव असून रविंद्र प्रल्हाद बोरकर असे अन्य इसमाचे नाव आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सोमवारी केली.तक्रारकर्ता हे किरमटी येथील रहिवासी असून त्यांच्या वडीलांच्या नावावर गटक्रमांक ३८६/१ कऱ्हांडला येथे साझा क्रमांक १६ या त्यांच्या मालकीच्या शेतीवर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय, वित्त आणि विकास महामंडळ यांच्या कार्यालयातर्फे दुग्ध व्यवसायासाठी १ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सदर शेतीच्या सातबाऱ्यावर १ लाख रुपयांचा बोझा चढविण्यासाठी तक्रारदार यांनी विरली बुज. येथील तलाठी मुरलीधर शेंडे यांच्याशी संपर्क साधला.या संदर्भात अर्जही सादर केला. सातबारावर नोंद करण्यासाठी शेंडे यांनी ५०० रुपयांची लाच मागितली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्याकडे तक्रार नोंदविली. सोमवारी सापळा रचून तलाठी मुरलीधर शेंडे व रविंद्र बोरकर यांना ५०० रुपयाची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.लाखांदूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, संजय कुरंजेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, कोमल बनकर, श्रीकांत हत्तीमारे, रसिका गंगाने, मनोज चव्हाण यांनी केली.

blank