राजनांदगाव ते नागपूर तिसऱ्या ट्रॅकचा शुभारंभ

0
20

गोंदिया,दि.25 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या राजनांदगाव ते नागपूरदरम्यान मंजूर झालेल्या तिसऱ्या ट्रॅकच्या बांधकामाला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून सुरूवात करण्यात आली. या ट्रॅकमुळे सध्याच्या अस्तित्वात असलेल्या ट्रॅकवरुन होणारी प्रवासी वाहतूक व मालगाड्यांच्या वाहतुकीमधील वर्दळीला काही प्रमाणात ब्रेक लागेल आणि रेल्वेगाड्यांना होणारा विलंब टाळून वेळेवर धावण्यासाठी मदत होणार आहे.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ.रमण सिंह, खा.अभिषेक सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२२) रेल्वेच्या अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलसिंह सोईन, बिलासपूर झोनचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बिलासपूर, रायपूर व नागपूर मंडळातील सुविधा वाढविण्यासाठी नवनवीन कामांचे भूमिपूजनही करण्यात आले.

रेल्वेमंत्र्यांनी रायपूर रेल्वे स्थानकावर व्हीडिओ लिंकच्या माध्यमातून राजनांदगाव ते नागपूरदरम्यान तिसऱ्या नवीन रेल्वे लाईनच्या बांधकामाचा शुभारंभ केला. यावेळी राजनांदगाव स्थानकावर खा. नाना पटोले, आ. लेश्वर शाहू, चरण वाघमारे, महापौर मधूसुदन यादव यांच्यासह मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल नागपूर व बिलासपूर झोनचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.रायपूरच्या गुढियारी प्रवेशद्वावर एस्कलेटर व लिफ्ट, दुर्ग स्थानकावर तीन लिफ्टची सुविधा, दुर्ग व बिलासपूर स्थानकावर हाय स्पीड वाय-फाय, दुर्ग-ह. निजामुद्दीन-दुर्ग हमसफर द्वि साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ याबरोबरच नागपूर मंडळांतर्गत राजनांदगाव ते नागपूरदरम्यान तिसऱ्या नवीन रेल्वे लाईनच्या आधारशिलेचा शिलान्यास तसेच डोंगरगड स्थानकावर नवनिर्मित फुट ओव्हरब्रिजचे उद्घाटन करण्यात आले.

या योजनेत वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम होणार आहे. त्याची लांबी ९४५.७ मीटर आहे. या लाईनवर एकूण चार जंक्शन स्टेशन राहतील. यात गोंदिया, तुमसर रोड, कन्हान व कळमना यांचा समावेश आहे. त्यासाठी सन २०१७-१८ साठी २५० कोटीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या खंडावर ३१५ लहान व ३१ मोठे पूल व २४ क्रॉसिंग स्टेशन आहेत.यात ५० किमीपेक्षा अधिक अंतराच्या क्षेत्रात दाट जंगल व पहाड आहेत. जवळपास २६२ किमीच्या या रेल्वे लाईनवर ७५ लहान-मोठे पूल आहेत. मात्र आता कामाचा शुभारंभ झाल्याने या अडचणीसुद्धा दूर होतील.राजनांदगाव व नागपूरदरम्यान तिसऱ्या नवीन रेल्वे लाईनची लांबी २२८ किमी आहे. यात ५० किमी छत्तीसगड व १७८ किमी महाराष्ट्रातील क्षेत्राचा समावेश असून यात गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या परियोजनेची अंदाजे किंमत १,९०९ कोटी आहे.

दुर्ग-बिलासपूरदरम्यान जवळपास १४० किमीमध्ये तिसरी लाईन बनून तयार झाली आहे. दुर्ग ते राजनांदगावदरम्यान २८ किमीच्या तिसऱ्या लाईनचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण झाले. तेथे दोन मोठे व २१ लहान पुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. राजनांदगाव ते नागपूरपर्यंत तिसरी लाईन घालण्यात काही अडचणी होत्या.