चंद्रपूर दि.5: स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत विदर्भातून पहिल्या आलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेने कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर तब्बल ९० टक्के महिलांना रोजगार उपलब्ध केला आहे. राज्यात आघाडी मिळविण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्या तब्बल ५३५ जणाविरोधात कारवाई करण्यात आली. त्यापैकी घटनास्थळी सापडलेल्या १५० जणांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
स्वच्छ भारत अभियानात चंद्रपूर मनपाचे नाव चर्चेत आले आहे. आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अभियंता हजार, संतोष गर्जेलवार आदी अधिकारी वर्गाच्या नेतृत्त्वात ही मोहीम राबविण्यात आली. देशातून ७६ वा व राज्यातून सहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत देशातील ७२६, तर राज्यातील ४४ शहरांनी भाग घेतला होता. ११, १२ व १३ जानेवारी २०१७ रोजी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तीन सदस्यीय समितीमार्फत आॅनलाईन स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेतलेली होती. यानंतर ७ फेब्रुवारीला पुन्हा एका सदस्यीय समितीने सर्वेक्षण केले. त्यामध्ये चंद्रपूरात मनपाने स्वच्छतेवर केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
मनपाने गुड मॉर्निग पथकाचे गठन केले होते. हे पथक दररोज सकाळी शहरामध्ये फेरफटका मारत होते. यावेळी उघड्यावर शौचास जाणाऱ्या भागात भेट देऊन कारवाई करण्यात येत होती. या कारवाईमुळे शहराच्या स्वच्छतेत भर पडली आहे. या कारवाईमध्ये नागरिकांकडून तब्बल ३५ हजार रुपये दंड वसूल करणारी राज्यात एकमेव महानगरपालिका ठरली आहे. मनपाने स्वच्छतेवर विविध स्पर्धा घेतल्या. त्यापैकी अबुल कलाम आझाद बगिचाच्या संरक्षण भिंतीवर घेण्यात आलेली स्पर्धा सर्वांच्या चर्चेचा विषय होती. शहरातील ३५ सार्वजनिक शौचालयांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.





