26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home क्रीडा अहेरीच्या अजय मिट्टावारची क्षेत्रिय क्रिकेट संघात निवड

अहेरीच्या अजय मिट्टावारची क्षेत्रिय क्रिकेट संघात निवड

0
27

अहेरी, दि..२०: येथील क्रिकेट खेळाडू अजय सत्यनारायण मिट्टावार याची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विभागीय संघात निवड झाली आहे.नुकत्याच पार पडलेल्या व्हीसीएच्या गडचिरोली-चंद्रपूर सामन्यात गडचिरोली संघ ९० धावसंख्येवर ७ बाद अशी बिकट स्थिती असताना अजयने आठव्या क्रमांकाला फलंदाजीला येत नाबाद ५७ धावांची खेळी करत संघाकडे विजयश्री खेचून आणली. अजयच्या या संयमी व सुरेख फलंदाजीने प्रभावीत होऊन विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांनी त्याची गडचिरोली-चंद्रपूर या विभागीय संघामधे निवड केली. हे सामने बुलढाणा येथे होणार असून अजय त्यासाठी रवाना झाला आहे.

अहेरी येथील स्व.विश्वेश्वरराव महाराज हॉकी मैदानावर क्रिकेटला लागणाऱ्या साहित्याची प्रचंड वाणवा असतानासुद्धा अजयने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही कामगिरी करून दाखवली आहे. अहेरी विभागातून अशाप्रकारची कामगिरी करणारा अजय हा एकमेव खेळाडू आहे.अहेरी विभागात अतिशय प्रतिभावंत खेळाडू असून, केवळ सुविधा मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. विशेष सुविधा पुरविल्या गेल्यास अहेरी विभागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होणार होऊ शकतात, असे जाणकारांना वाटत आहे. मात्र, त्यासाठी प्रशासन व दानशूर व्यक्तींनी अशा खेळाडूंना सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे.अजय मिट्टावार यास नंदकुमार कदम, किशोर शेंडे, डॉ. दीपक मुंढे, शुभम येल्लूरकर यांचे मार्गदर्शन तसेच अहेरी येथील आदर्श मंडळाचे सर्व सदस्य, मोरेश कुमराम, बबलू सडमेक, संतोष बेजंकीवार यांनी प्रोत्साहन दिले आहे.

blank