अनिल कुंबळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार

0
10

नवी दिल्‍ली-अनिल कुंबळेने टीम इंडियाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयशी झालेल्‍या करारानूसार प्रशिक्षक म्‍हणून कुंबळेचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यापुढे टीम इंडियाचे प्रशिक्षक म्‍हणून कुंबळे राहू इच्छित नव्‍हते. त्‍यामुळे अखेर त्‍यांनी राजीनामा दिला आहे. याच कारणामुळे कुंबळेने टीम इंडियासोबत वेस्‍ट इंडिजच्‍या दौ-यावर जाण्‍याऐवजी लंडनला राहणेच पसंत केले.गेल्यावर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात मतभेद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, अनिल कुंबळेने स्वत:सह खेळाडूंच्या मानधनात मोेठी वाढ करण्याची मागणी केल्याने त्याचे आणि बीसीसीआयचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. अखेर आज कुंबळेने राजीनामा देत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला. कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील संबंध अधिकच बिघडले होते. विराटने कोणत्याही परिस्थितीत कुंबळेसोबत जुळवून घेणार नसल्याचे क्रिकेट सल्लागार समितीसोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. आता कुंबळेने पद सोडल्यानंतर भारताचा नवा प्रशिक्षक कोण होईल, याची उत्सुकला क्रिकेटप्रेमींना लागली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवागसह अनेक माजी क्रिकेटपटू शर्यतीत आहेत.