
नागपूर,दि.25 – वर्धा रोडवरील चिंचभुवन नाल्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मनीष राजाराम शेरकुरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोहणे येत नसल्यानंतरही अतिआत्मविश्वास दाखवून पाण्यात उडी मारल्याने त्याला जीव गमवावा लागला.
राजाराम शेरकुरे हे मूळचे मध्यप्रदेशातील असून, कामाच्या शोधात नागपुरात आले होते. त्यांना मनीष हा 11 वर्षांचा एकुलता मुलगा होता. तो परसोडीतील शासकीय शाळेत आठव्या वर्गात शिकत होता. रविवारी मनीष घरातून अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर तो आढळून आला नाही. त्यामुळे राजाराम यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा शोध सोमवारीही सकाळपासूनच सुरू होता. कुणी अपहरण तर केले नसावे? कुठे निघून तर गेला नसावा? मित्रांच्या गावी गेला असेल का? असे अनेक प्रश्न होते. मात्र, दुपारच्या सुमारास चिंचभवन नाल्यात एका विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगताना आढळल्याची खबर त्यांची कानी पडली. राजाराम आणि त्यांची पत्नी धावतच नाल्याजवळ पोहोचले. तेथे मनीषची चप्पल आणि कपडे आढळून आले.पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला आणि पोलिस ठाण्यात नोंद केली.




