३१ जुलै पर्यंत पीक विमा योजनेचा लाभ घ्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
9

गोंदिया,दि.२५ : यावर्षी पाऊस अनिश्चित स्वरुपाने पडतो आहे. पावसाच्या या लहरीपणाचा शेतीच्या व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. नैसर्गीक संकटात शेतीच्या नुकसानीची योग्य भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी जिल्ह्यातील कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होवून दि.३१ जुलै पर्यंत पीक योजनेचे हप्ते भरुन या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन ‍जिल्हाधिकारी यांनी केले आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी पाऊस दि.२४ जुलै पर्यंत ३७३.८ मि.मी. इतका झाला आहे, त्याची टक्केवारी ६६ टक्के इतकी आहे. मागील वर्षी ४६० मि.मी. पाऊस आजपर्यंत पडला होता. ५६७.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. काही महसूल मंडळात ६० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे भाताची रोपे तयार आहे, परंतू रोवणी रखडलेली आहे.
शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमून्यात अर्ज सादर करावा. सातबारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक जोडावी. भात पिकासाठी प्रति हेक्टरी ३९ हजार रुपये विमा संरक्षण देण्यात येईल. शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता म्हणून ७८० रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे भरावे. नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नूकसान झाल्यास ४८ तासाच्या आत त्याबाबत संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक/महसूल विभाग यांना कळवावे. १८००२७००३२ या रिलायन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांवर शेतकऱ्यांनी पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास संपर्क साधावा. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.