मुंबई,दि.14(विशेष प्रतिनिधी) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे जुने मित्र आहेत. मित्र जेव्हा चुकतो तेव्हा त्याला बोलण्याचा अधिकार दुसऱ्या मित्राला असतोच. आपण तेच तर काम करत आहोत, असे स्पष्ट करत ‘राज्यातील शेतकऱ्यांना बोगस ठरवण्याचा हक्क महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना कुणी दिला,’ असा खडा सवाल भाजप खासदार नाना पटोले यांनी सरकारला केला. पटोले बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.
धान उत्पादक, मच्छिमार आदींच्या प्रश्नावर खा. पटोेले यांनी बुधवारला मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते पत्र परिषदेत बोलत होते. मी मुख्यमंत्र्यांकडे बोगस शेतकºयांचा विषय काढला. त्यावर त्यांनी या विषयी त्यांच्याकडे काहीही माहिती आली नसल्याचे सांगितले. महसूलमंत्री पाटील यांच्याकडे दहा लाखांचा आकडा कुठून आला माहीत नाही. ते काहीही बोलून शेतकºयांच्या जखमांवर मीठ चोळत असतील तर मी शांत बसणार नाही. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, आॅनलाइन अर्जाची भानगड नकोच, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगस शेतकरी आढळल्याचे स्वत: नाकारले आहे. असे असताना महसूलमंत्री राज्यात दहा लाख शेतकरी बोगस असल्याचे विधान करतात ही बाब अतिशय गंभीर अाहे. शेतकरी नेता म्हणून चीड आणणारी आहे, असे पटोले यांनी सांगितले. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवर आपण नाराज आहोत, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच मिळाली पाहिजे होती, अशी ठाम भूमिका घेत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना सातबारासह बँका, आधार आदी सर्व पुरावे द्यावे लागतात. सरकारने ठेवलेल्या निकषानुसार शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरत आहेत तरीसुद्धा मंत्री त्यांना बोगस ठरवतात. याविषयी आपण आजच मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. शेतकरी बोगस असल्याचे आपल्या तरी निदर्शनास आले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितले, असे पटोले यांनी सांगितले.विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या ओडिशासारख्या राज्यात धानाला (भात) २ हजार ९९० रुपयांचा हमीभाव मिळतो. मात्र महाराष्ट्रात धानाला योग्य भाव मिळत नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील योजनांमधून देशाला दिशा मिळायची. आता ती परिस्थिती राहिली नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार चुकत असेल तिथे यापुढेही बोलतच राहणार, असा निर्धारही पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.





