25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home राजकीय आम्हीही काही शेपूट घातले नाही!

आम्हीही काही शेपूट घातले नाही!

0
27

गरज भासली तर सरकारशी संघर्ष करू – उद्धव ठाकरे

मुंबई- राज्य स्थिर ठेवण्यासाठी शिवसेनेची गरज होती. त्यामुळे आम्ही तडजोड केली. पण शिवसेनेने शेपूट घातले, असा समज करून घेऊ नका, असा सज्जड इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. सरकारमध्ये आहोत म्हणून आम्ही शांत बसणार नाही. गरज भासल्यास सरकारशी संघर्ष सुद्धा करू, अशी गर्जना त्यांनी केली.
उद्धव यांच्या या वक्तव्यावर भाजपमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून शिवसेना-भाजपमधील धुमसणारा विसंवाद यानिमित्ताने चव्हाटय़ावर आल्याचे दिसत आहेे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टोलेबाजी केली. गेले काही दिवस खदखदणारी नाराजी उद्धव यांच्या वक्तव्यातून बाहेर पडली. आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत उभय पक्षांत सुरू झाल्याचे यातून मिळत आहेत. शिवसैनिक हे कोणत्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाहीत, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केलेल्या घर वापसी, चार मुले आदी मोहिमांवरही त्यांनी कोरडे ओढले. काश्मीरमधील विस्थापित पंडितांची घर वापसी कधी होणार, असा सवाल करीत त्यांनी मोदी सरकारवरही शरसंधान केले. स्वबळावर शिवसेनेच्या ६३ जागा आल्या, ही साधीसुधी गोष्ट नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, की हिंदूंना वाली कोण, हा प्रश्न असेल तर हिंदूंनी जीव दिलेला बरा.
बाळासाहेबांचे स्मारक सन्माकपूर्वकच उभारले गेले पाहिजे, त्यासाठी कोणाचेही उंबरठे झिजविणार नाही, असेही उद्धव या वेळी म्हणाले. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होते किंवा नाही, यावर शिवसैनिकांची नजर राहील, असा इशारा देऊन प्रसंगी सरकारविरोधात उभे राहू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
हिंदुत्ववाद्यांची खिल्ली
चार मुले जन्माला घाला, असे सांगितले जाते, पण ती पोसणार कोण, असा सवाल करीत उद्धव यांनी हिंदुत्ववादी नेत्यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडविली. कोणतेही अस्तित्व संख्येवरून मोजू नये, तर बळावरून मोजले पाहिजे. एक मुलगा असला तरी चालेल, तो वाघासारखा असावा, असेही ते म्हणाले.