देशात प्रथमच बाईक आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणा-या पेट्रोलसाठी विमान इंधनापेक्षा (एटीएफ) जास्त पैसा मोजावा लागत असल्याची परिस्थिती ओढवली आहे.
नवी दिल्ली – देशात प्रथमच बाईक आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणा-या पेट्रोलसाठी विमान इंधनापेक्षा (एटीएफ) जास्त पैसा मोजावा लागत असल्याची परिस्थिती ओढवली आहे.
महसुली कसर भरून काढण्यासाठी या पेट्रोलवर लादण्यात आलेले विक्रमी उत्पादनशुल्क यासाठी कारणीभूत ठरले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती ५८.९१ रुपये प्रति लिटर आहेत, तर विमान इंधनाचा दर ५२.४२ रुपये प्रति लिटर एवढा आहे. पेट्रोलवरील शुल्कवाढीतून सरकारने १८,००० कोटी रुपयांच्या महसुलाची तरतूद केली आहे.
सर्वसाधारणपणे एटीएफच्या तुलनेत पेट्रोल हा वजनाने कमी असल्याने त्याची किंमतही कमी असते. मात्र पेट्रोलवर सलग चार वेळा वाढवण्यात आलेल्या उत्पादनशुल्काने हे समीकरणच बदलून टाकले आहे. एकूण ७.७५ प्रति लिटरने पेट्रोलवरील उत्पादनशुल्क वाढून ते १६.९५ प्रति लिटरवर गेले आहे.
पेट्रोलियम खात्याच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २००२मध्ये पेट्रोलवरील नियंत्रण उठवल्यानंतर १०.५३ रुपये प्रति लिटर उत्पादनशुल्क होते. ते मे २००५मध्ये पुन्हा नियंत्रण आणल्यानंतर १४.५९ रुपयांवर गेले. मार्च २००८मध्ये १४.७८ रुपयांच्या उच्चांकी स्तरावर हे शुल्क पोहोचल्यानंतर २०१२मध्ये ते पुन्हा ९.४८ रुपये प्रति लिटरवर आले. यानंतर जून २०१०मध्ये पुन्हा पेट्रोल नियंत्रणमुक्त झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील भावानुसार त्याचे भाव ठरू लागले.
गेल्या ऑगस्टपासून जागतिक तेलाच्या किमतींनी गेल्या साडेपाच वर्षाचा नीचांक पाहिला. या घसरणीसह पेट्रोलच्या किमती ९ वेळा कमी होऊन हे इंधन १४.६९ प्रति लिटरने स्वस्त झाले. मात्र त्याच वेळी १२ नोव्हेंबरला १.५० रुपया प्रति लिटरर, २ डिसेंबर २.२५ रुपये आणि २ जानेवारी व १६ जानेवारीला प्रत्येकी २ रुपयांने उत्पादन शुल्क वाढवले आहे. एटीएफवर ८ टक्के उत्पादनशुल्क आहे
या शुल्कवाढीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीमध्ये १८,००० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहेत. तूट नियंत्रणासाठी या शुल्कात वाढ करणा-या सरकारच्या एकूण उत्पादनशुल्क महसुलात ९४,१६४ कोटी रुपये पेट्रोलियम उत्पादनांवरील शुल्कातून येत असून हे प्रमाण निम्मे आहे.




