37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Featured News रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब शिंदे यांचे निधन

रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब शिंदे यांचे निधन

0
31

blank

श्रीरामपूर, दि. २७ – शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. शिंदे यांच्या निधनाने रयत शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त केली जात आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जाळे तयार केले होते. त्यांच्या पश्चात रावसाहेब शिंदे यांनी समर्थपणे ही धूरा पेलली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आभाळाकडे झेप घेता यावी म्हणून त्यांनी दिशादर्शक प्रकल्प, ग्रंथालय, कॉलेज अशा सुविधा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांसाठी शिंदे यांनी संगमनेरमध्ये आदर्श वसतीगृह उभारले. तसेच श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापनाही केली. गेल्या अनेक वर्षांपासून ते रयत शिक्षण संस्थेत कार्यरत होते.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील पाडळी या गावात रावसाहेब शिंदे यांचा जन्म झाला होता.शिक्षणासोबतच शेती आणि गोपालन या क्षेत्रातही ते सक्रीय होते. राष्ट्र सेवा दलात सक्रीय असलेल्या शिंदे यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. यासाठी त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. भूमिगत राहून १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात गुप्त बैठका घेणे आणि बुलेटिन काढणे असे कामही त्यांनी केले. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास रावसाहेब शिंदे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता श्रीरामपूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

blank