लोकाभिमुख विकासासाठी शासन कटीबध्द: पालकमंत्री

0
13

गडचिरोली,दि.26: जिल्ह्यातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासन आणि पारदर्शक कार्यप्रणाली शासनाव्दारे अंगिकारण्यात येत आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व सामान्य जनतेचा सक्रीय सहभाग घेण्यावर शासनाचा भर राहणार आहे. लोकाभिमुख विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अंब्रीशराव आत्राम यानी केले. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष निर्मला मडके, जिल्हाधिकारी रणजितकुमार, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर, अतिरीक्त पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, राजकुमार शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, नवीन औद्योगिक धोरणांतर्गत जिल्हयातील युवक, युवतीना औद्योगिक प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमावर आधारीत शिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हयात वन व्यवस्थापन समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अगरबत्ती प्रकल्पासारख्या उद्योगातून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला आहे. त्याव्दारे नवीन सुशिक्षीत पिढी निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हयातील मोठी लोकसंख्या मजुरीवर अवलंबून असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत केंद्र शासनाने दिलेले उद्ष्टि पूर्ण करुन जिल्हयातील प्रत्येक कामाची मागणी करणाऱ्या कुटुंबाला काम मिळेल असे प्रशासनाने प्रयत्न करावे. गडचिरोली या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल क्षेत्रात विकासात निर्माण होणाऱ्या अडथळयावरती मात करण्यासाठी पोलिस विभागाने पुढाकार घ्यावा. नवसंजीवन योजनेच्याव्दारे, तसेच नक्षल चळवळीपासुन दुर जाण्यासाठी मत परिवर्तन करुन आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त करावे. आणखी काम करण्याचे गडचिरोली पोलिस विभागाने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. वन हक्क कायद्यामध्ये जिल्हयाने महाराष्ट्रात सर्वात जास्त पट्टे वाटप केले आहे. परंतु उर्वरित काम प्रशासनाने पुढाकार घेऊन पूर्ण करावे, असेही ते म्हणाले. अतिदुर्गम गांवे मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी आम्ही कटीबध्द असून सर्वांगिण विकासासाठी हे शासन सातत्याने प्रयत्न करीत राहणार आहे. सिंचनाची सुविधा निर्माण करुन उद्योगाद़वारे बेरोजगारांना काम देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. प्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मंगेश देशमुख, जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार करिश्मा भोयर, जिल्हा युवा पुरस्कार कुणाल पडालवार, पुण्यश्लोक अहिल्या‍बाई होळकर पुरस्कार प्रतिभा प्रभाकर चौधरी व प्रा. निलीमा कर्मजीत सिंह यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच राष्ट्रपती पोलिस पदकाचे मानकरी ठरलेले जिल्हयातील पाेलिस शिपाई व अधिकारी यामध्ये शहीद पोलिस गणपत नेवरु मडावी, गिरीधर नागो आत्राम, सुनिल तुकडू मडावी यांच्या कुटुंबीयाना पुरस्का‍र प्रदान करण्यात आले. तसेच पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलिस शिपाई सदाशिव लखमा मडावी, गंगाधर शिडाम, मुरलीधर सखाराम वेलादी, पाेलिस उपनिरिक्षक अतुल श्रावण तवाडे, अंकूश शिवाजी माने, पोलिस शिपाई विनोद मेसो हिचामी, इंदरशहा वासुदेव शेडमेक यांचा यावेळी पालकमंत्री राजे अंब्रीशराव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पाेलिस अधीक्षक सुवेझ हक, उप विभागीय पोलिस अधिकारी यशवंत अशोक काळे यांना पोलिस शौर्यपदक मिळाल्याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . कार्यक्रमाचे संचलन संयुक्तरित्या विनोद दशमुखे व ओमप्रकाश संग्रामे यांनी तर उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी मानले.