नागपूर,दि.18 : नागपूर जिल्ह्यातील बंधारयाची कामेसुद्धा आता राळेगण सिद्धीच्या धर्तीवर करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.बचत भवन येथे नागपूर जिल्ह्यातील जलसंधारण व जलयुक्त शिवार कामासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, रोहयो उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात तीन वर्षात ४९८ गावांपैकी ४३२ गावे जलयुक्त झाली आहेत. विविध उपाययोजनांमुळे शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाणी टंचाईवर मात करतानाच भूगर्भातील जलाशयात लक्षणीय वाढ झाली आहे.
नदी, नाल्याचे पाणी अडवून बंधारा बांधण्यात येतो. या बंधाºयात अधिक जलसाठा शिल्लक राहावा, याकरिता बंधाºयाची कामे राळेगणसिद्धी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्या प्रमाणे करण्यात यावी. याकरिता प्रत्यक्ष राळेगणसिद्धी येथील बंधाऱ्या ची पाहणी करून अहवाल तयार करण्याच्या सूचना सुद्धा पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याना केल्या.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी यावेळी दिली. तसेच शासकीय विभाग आणि लोकसहभागातून पहिल्याच वर्षी ३१३ गावांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार मृदा व जलसंधारणाची ५ हजार ५१ कामे पूर्ण करण्यात आली. ६१.८८ लाख घनमीटर नाल्यातील व तलावातील गाळ काढण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानात २०१६-१७ या वर्षात ११९ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. या अभियानातंर्गत २०१७-१८ या वर्षात नागपूर जिल्ह्यातील २२० गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. माथा ते पायथा तत्त्वावर निवडण्यात आलेल्या गावांमध्ये ३ हजार ४१९ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांवर १५० कोटी ८४ लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.





