
छाया- देवरी येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना देवरीचे कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे
देवरी- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत एक दिवसीय कृषी प्रशिक्षणाचे आयोजन गेल्या सोमवारी देवरी येथे करण्यात आले होते.
स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजीत या शिबीराचे उद्घाटन पिंडकेपारचे प्रगतिशील शेतकरी हंसराज कोलीया यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवरीचे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेन इरिगेशनचे वरिष्ठ कृषीविद्यावेत्ता डॉ. सिद्दभट्टी, कृषी व पणन तज्ज्ञ विलाश शिंदे, कृषी अधिकारी संतोष अग्रवाल, मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके, कृषी पर्यवेक्षक प्रकाश मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल शिंदे यांनी केले. एमएसीपी प्रकल्प संकल्पना व त्यांची उद्दिष्ट्ये याविषयी शिंदे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सिद्दभट्टी यांनी तुषार सिंचन,ठिंबक सिंचनाचे महत्व व केळी लागवड यावर सविस्तर मार्गदर्शन केले. भाजीपाला पिकांची प्रतवारी, मूल्यवर्धन व करारशेती यावर रामटेके यांनी मार्गदर्शन केले.गटसमूह स्थापना व उद्देश याबाबत मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. यांवेळी पिंडकेपार येथील प्रगतिशील शेतकरी हंसराज कोलीया यांनी आपले अनुभव कथन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात कोटांगळे यांनी कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. संचलन एस.के लांडगे केले. उपस्थितांचे आभार शिवणकर यांनी मानले.यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते




