मोदींच्या १५ लाख रुपयांच्या विधानाचा ‘तो’ अर्थ नव्हता – अमित शहा

0
9

नवी दिल्ली, दि. ५ – काळा पैसा परत आणल्यास प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील या नरेंद्र मोदींच्या आश्वासनाची आता विरोधकांकडून खिल्ली उडवली जात असतानाच भाजपाध्यक्ष अमित शहा हे मोदींची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदींनी १५ लाख रुपये जमा होतील हे विधान फक्त उदाहरण म्हणून दिले होते. काळा पैसा परत आल्यास प्रत्येक भारतीयाचा आर्थिक विकास शक्य होईल हाच मोदींच्या विधानाचा अर्थ होता असे स्पष्टीकरण भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांवर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भाजपापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळत असून यापार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यामध्ये शहा यांनी मोदींवर होणा-या टीकेवर भाष्य केले. राहुल गांधी यांनी मोदींच्या सूटवरुन दिल्लीतील सभेत टीका केली होती. यावर शहा म्हणाले, राहुल गांधी यांच्या म्हणण्याने काय होते ?, राहुल गांधींनी असे वैयक्तिक आरोप करणे थांबवले पाहिजे, केजरीवाल यांचा मफलर कुठून आला, त्या मफलरची किंमत काय असा सवाल त्यांनी केजरीवाल यांना का नाही विचारला असा प्रश्नही शहा यांनी उपस्थित केला. केजरीवाल यांच्या म्हणण्यात व करण्यात फरक असल्याची टीका त्यांनी केली.
आम आदमी पक्षाच्या देणगण्यांवरुन निशाणा साधत केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाला मध्यरात्री २ कोटी रुपयांचा निधी कसा मिळाला हे स्पष्ट करावे असे शहा यांनी म्हटले आहे. भाजपाला मिळणा-या निधीची माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी जमा करतो असे शहांनी नमूद केले.