गोंदिया,दि.16ःः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी देश काँग्रेस मुक्त करण्याचा नारा देत आहे. मात्र गोंदियातील स्थानिक काँग्रेस नेते भाजपासोबत युती करुन जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असून गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस ही फक्त आमदार अग्रवाल काँग्रेस ठरल्याची टिका राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केली. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे सर्व पर्याय खुले ठेवले होते. काँग्रेसचे निरीक्षक हर्षवर्धन सपकाळ व अतुल लोंढे यांनी देखील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थानिक काँग्रेस नेत्यांना समविचारी पक्षासोबत आघाडी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र स्थानिक नेत्यांनी ते निर्देश पाळले नाही.उलट भाजपसोबत पुन्हा युती करून काँग्रेस विचारधारेला मुठमाती दिल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केली.आम्ही मात्र आमच्या भूमिकेवर ठाम असून जिल्हा परिषदेच्या सभागृहात कुठल्याही खोट्या व चुकीच्या मुद्यावर सत्ताधारी सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले.





