
अमरावती,दि.17 – रिपब्लिकन पक्ष व नेत्यांचा आजवरचा इतिहास पाहिला असता एकही नेता कुणाच्या मदतीशिवाय निवडून आलेला नाही. हीच स्थिती आजही आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे किंवा मला कुण्या पक्षाशी युती केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.डॉ. गवई म्हणाले की, रिपब्लिकन ऐक्याची भाषा पुन्हा बोलली जाऊ लागली. माझेही ऐक्याला समर्थन राहील; मात्र एकेकाळी दादासाहेब गवई तसेच शरद पवार यांच्या पुढाकारातून झालेले ऐक्य पुन्हा होण्याची शक्यता कमीच आहे. तसे असले तरी ऐक्याची प्रक्रिया प्रामाणिकपणे सुरू झाल्यास आपल्यापेक्षा ज्येष्ठ ॲड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले तसेच प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यानंतरचा क्रमांक मिळाला तरी हरकत राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.




