
नागपूर,दि.04- शिकवणीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला परीक्षेपूर्वी मदत करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे, या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सध्या शिक्षक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. किशोर हूड असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना रविवारी उघडकीस आली.
आरोपी शिक्षक किशोर हूड याचे पाटनकर चौकात ब्राईट नावाने कोचींग क्लास आहे. येथे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जरीपटक्यात राहणारी सान्वी (बदललेले नाव) हीने बारावीत असताना ऑगस्ट महिन्यात ट्युशन क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. अविवाहित असलेल्या किशोरच्या नजरेस ती पडली. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. सान्वीसोबत तो संबध ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, परीक्षेच्या तणावामध्ये असलेली सान्वी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होती.
सप्टेंबर 2017 मध्ये किशोरने तिला परीक्षेपूर्वी काही महत्वाचे प्रश्न काढून परीक्षा केंद्रावर मदत करण्याचे आमिष दाखवले. त्याने क्लासमध्ये रात्रीच्या सुमारास “एक्स्ट्रा क्लास’च्या नावाखाली सान्वीवर बलात्कार केला. परीक्षेचा कालावधी जवळ आल्यानंतर तो वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. त्याने अनेकदा तिला सीताबर्डीतील लॉजवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सान्वीने शिक्षकासोबतचे संबंध तोडले. ती सध्या बी.एसस्सी द्वितीय वर्षात शिकते. किशोरने तिला लग्न करण्यास तयार असल्याचे सांगून पुन्हा संबंध पूर्वरत केले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार लैंगिक शोषण केले.




