35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ साडेपाच हजार हेक्टर पिकांची हानी

साडेपाच हजार हेक्टर पिकांची हानी

0
27

अवकाळी पाऊस : १८ हजार ३६७ शेतकर्‍यांना फटका, शेतीसह छोट्या व्यावसायिकांचे नुकसान

गोंदिया : गेल्या १ व २ मार्च रोजी आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रबी पिकांना जबर फटका बसला. या पावसाने जिल्ह्यात ५ हजार ८२५.७५ हेक्टरमधील रबी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे १८ हजार ३६७ शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागणार आहे.
विशेष म्हणजे ५0 टक्क्यांच्या वर नुकसान गोंदिया, तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील रबी पिकांचे झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. मात्र आमगाव, सालेकसा, देवरी, सडक-अर्जुनी व मोरगाव-अर्जुनी या तालुक्यात रबी पिकांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
गोंदिया तालुक्यात ८५७ हेक्टरमधील लाखोळीचे पीक, ८0८ हेक्टरमधील चना, १५५ हेक्टरमधील गहू, १७३ हेक्टरमधील भाजीपाला व १८ हेक्टरमधील फळबागेचे नुकसान झाले आहे. गोंदियातील एकूण दोन हजार ११ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका १२ हजार १२0 शेतकर्‍यांना बसला आहे.
गोरेगाव तालुक्यात २0 हेक्टरमधील लाखोळी व १0 हेक्टरमधील भाजीपाला असे एकूण ३0 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. तर त्याचा फटका ५१ शेतकर्‍यांना बसला आहे.
तिरोडा तालुक्यात एक हजार २३५ हेक्टरमधील लाखोळी, ८३२.0५ हेक्टरमधील हरभरा, ३३0 हेक्टरमधील गहू, ११५ हेक्टरमधील भाजीपाला, एक हजार ११८.७0 हेक्टरमधील जवस व १५४ हेक्टरमधील वाल, वाटाणा, पोटप आदी इतर पिकांचे नुकसान झाले आहे. तिरोडा तालुक्यातील एकूण तीन हजार ७८४.७५ हेक्टरमधील रबीच्या पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका सहा हजार १९६ शेतकर्‍यांना बसला आहे. कृषी विभागाच्या वतीने संयुक्त सर्व्हेचा अहवाल आल्यानंतरच नुकसानभरपाईची कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी महसूल व कृषी विभागाला योग्य त्या सूचना केल्या आहेत.

blank