३५२ भारतीय कैदी अजूनही पाकच्या कारागृहात

0
10

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,-पाकिस्तानमधील विविध कारागृहांमध्ये मासेमारांसह भारतातील एकूण ३५२ कैदी बंदिस्त असल्याची माहिती सरकारतर्फे आज बुधवारी लोकसभेत देण्यात आली.
सभागृहात विचारण्यात आलेल्या एका प्रश्‍नात परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान या दोन देशात २००८ साली माहितीचे आदानप्रदान करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत दोन्ही देशांनी १ जानेवारी २०१५ रोजी आपापल्या देशातील कैद्यांच्या संख्येची माहिती उघड केली आहे. पाकिस्तानच्या कारागृहांमध्ये ५० भारतीय कैदी आणि ४७६ भारतीय मासेमार होते. त्यानंतर काही जणांची सुटका करण्यात आली.
भारतीय कारागृहात पाकिस्तानचे २५३ कैदी आणि आणि १३२ मासेमार असल्याचे भारतातर्फे पाकिस्तानला कळविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त १६ फेब्रुवारी रोजी एक कैदी आणि १७२ भारतीय मासेमारांची पाकने मुक्तता केली होती. १ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या यादीतील एक कैदी नेपाळी असल्याचे स्पष्ट झाल्याने पाकच्या तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांची एकूण संख्या ३५२ असल्याचे त्या म्हणाल्या.