अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत करा-खासदार प्रफुल पटेल

0
16

गोंदिया/भंडारा : अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मागील दोन – तीन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा अडचणीत टाकले आहे. राज्यातील व केंद्रातील भाजपा प्रणित सरकारने शेतकर्‍यांच्या रबी पिकांच्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करून जास्तीत जास्त मदत करावी तसेच या अवकाळी पावसाने जवस, लाखोळी, चना, गहू, उन्हाळी धान, केळीच्या बागा व भाजीपाल्यांची पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना तसेच लघु उद्योग म्हणून विट भट्टी मालकांना झालेल्या नुकसानीची तातडीने मदत करावी अशी मागणी खासदार प्रफुल पटेल यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, महसूल व कृषी मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांचेकडे केली असून खासदार पटेल स्वत: यासंबंधी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार आहेत.
राज्यामध्ये आघाडीचे व देशामध्ये युपीएची सरकार असताना भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आसमानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या धान उत्पादक शेतकर्‍यांना वारंवार मदत करण्यात येत होती. एवढेच नाही तर धान उत्पादक शेतकर्‍यांना २00 प्रति क्विंटल बोनस सुद्धा जाहीर करून त्याचे वाटपही करण्यात आले होते. देशात युपीएचे शासन असताना जयश्रीराम व केसर सारख्या धानाला मागील वर्षी या काळात २६00 ते २७00 रुपये भाव मिळत होता.याव र्षी शासनानी हमी भावामध्ये ५0 रुपयांची वाढ केली खरी परंतु बोनस नाकारल्याने शेतकर्‍यांचे प्रती क्विंटल २00 रुपये नुकसान झाले व श्रीराम व केसर सारख्या धानाला १८00 ते १९00 रुपये यावर्षी भाव मिळत आहे.त्यामुळे हमी भावाने धान विकणार्‍या शेतकर्‍यांचे व केसर, श्रीराम सारख्या उच्च प्रतीच्या धान विकणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. एकीकडे धानाला भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे शेतकर्‍यांनी रब्बी पिकांची व नगदी पिके म्हणून यावर्षी भाजीपाल्यांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली होती. ज्यात उन्हाळी धान, जवस, लाखोळी, चना, गहू व भाजीपाला या प्रकारच्या धान्याचा समावेश होता. असंख्य शेतकर्‍यांनी नगदी पिके म्हणून केळीची बागाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली आहे.
या अवकाळी पावसामुळे प्रारंभिक सर्व्हेक्षणात गोंदिया जिल्ह्यातील सुमारे १५000 हेक्टर व भंडारा जिल्ह्यातील १५000 हेक्टर शेतजमिनी वरील विविध प्रकारच्या रब्बी पिकांचे, भाजीपाल्यांचे व केळीच्या बागांचे नुकसान झाले. तसेच विटभट्यांचे सुद्धा मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खासदार प्रफुल पटेल यांनी या नुकसानीची त्वरीत दखल घेवून राज्याच्या कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन तातडीची मदत करावी अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.