25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Top News नरभक्षक वाघिणीची अखेर शिकार

नरभक्षक वाघिणीची अखेर शिकार

0
35
file photo

यवतमाळ ,दि.03ः- मागील दीड वर्षापासून १३ जणांचा बळी घेणाऱया T१ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. यावेळी ही वाघीण आक्रमक झाल्याने अंगावर चालून आल्याने तिला शूट करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. बोराटीच्या जंगलातील नाल्यालागत या वाघिणीला ठार करण्यात आले आहे. यानंतर पंचनामा करुन तिला नागपूरला हलवण्यात आले आहे.गेल्या ४७ दिवसांपासून वाघिणीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तिला ठार केले. या वाघिणीनं गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता.

काल रात्री टी-1 वाघिणीचा शोध सुरू होता. त्यावेळी ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यावेळी तिने पथकाच्या दिशेने चाल केली. त्यामुळे शार्प शूटर अजगर अलीने तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. टी-1 वाघिणीचे दोन बछडे आहेत. त्यांचे वय 11 महिने इतके आहे. त्यांना शोधण्याचे आव्हान आता वन विभागासमोर असेल.

नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून अथक प्रयत्न सुरू होते. वाघिणीला पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून चार हत्ती आणण्यात आले होते. परंतु ते हत्तीही उधळले. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या एका पिसाळलेल्या हत्तीनेच महिलेला ठार केल्याची घटना घडली होती. याशिवाय पाच शार्पशुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचाऱ्यांची फौज एवढेच नाही तर वाघिणीचा हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर, इटालीयन कुत्रे आणण्यात आले होते. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. या शोध मोहिमेत लाखो रूपयांचा चुराडा झाला. वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली. खासगी शिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली होती

blank