लाचखोर तलाठय़ाला अटक

0
14

भंडारा,दि.03ः- शेतजमिन खरेदी केल्यानंतर गट क्रमांक वेगळा करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. सिद्धार्थ रामदास शेंडे (५२) रा. विरली (खंदार) ता. पवनी असे अटक करण्यात आलेल्या तलाठीचे नाव आहे.
तक्रारदार यांनी सन २0१८ मध्ये कुशन कारूजी खोये, रा. सोनेगांव (ता. पवनी) यांच्याकडून गट क्र. ३२६ मधील २६ आर शेतजमिन खरेदी केली. गट क्र. ३२६ मधील काही शेती विक्रेत्यांचा भाऊ वसंत खोये यांचे नावे आहे. त्यामधून तक्रारदाराने खरेदी केलेली २६ आर शेतजमिनीचा वेगळा गट क्रमांक करण्याकरीता (खुडवा) रितसर भूमीअभिलेख कार्यालय पवनी येथे अर्ज केला असता, त्यांनी खरेदी केलेल्या शेतीची मोजणी करून तक्रारदारास ‘क’पत्र देऊन संबंधित सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालय विरली (खं) यांच्याकडे सादर केले. त्यावरून तलाठी कार्यालयात जावून तलाठी सिध्दार्थ शेंडे यांना भेटून गट क्रमांक वेगळा करण्याबाबत विनंती केली असता , खरेदी केलेल्या शेतीचा गट क्रमांक वेगळा करण्याकरीता १२00 रुपये द्यावे लागतील नाहीतर काम होणार नाही असे सांगितले. तलाठय़ाने मागणी केलेली लाचेची रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा कार्यालयात तक्रार दाखल केली. शुक्र वारी, सापळा कारवाई दरम्यान तलाठी शेंडे याने तडजोडीअंती एक हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने अटक करण्यात आली.
अड्याळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पोलिस निरीक्षक प्रतापराव भोसले, सहाय्यक फौजदार गणेश पडवार, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, पोलिस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, पोलिस शिपाई अश्‍विनकुमार गोस्वामी, शेखर देशकर, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक यांनी केली.