39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा भांडूपकन्या हर्षदा पवार महिला महाराष्ट्र श्री २०१९ ची विजेती

भांडूपकन्या हर्षदा पवार महिला महाराष्ट्र श्री २०१९ ची विजेती

0
59

blank

शेखर भोसले/मुलुंड,दि.27: प्रयास क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ५८ व्या सिनियर महाराष्ट्र श्री २०१९ स्पर्धेत भांडूप येथील हर्षदा प्रदीप पवार ही ७ व्या वूमन फिटनेस स्पर्धेची विजेती ठरली. महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथील रानवारा रिसॉर्ट येथे १६ व १७ मार्च रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सिनिअर महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महिला गटात विजेती ठरलेली हर्षदा पवार भांडूप येथे राहत असून परिस्थितीचे चटके खात आज महिलांच्या वूमेन फिटनेस स्पर्धेत अजिंक्य ठरली. पदवीधर असलेल्या हर्षदाची आई ही हाराच्या दुकानात काम करते तर वडील ड्राइविंग करतात. भांडूप येथील पर्फेक्ट जिम येथे ती, तिचा नेहमीचा सराव करते तर शनिवार, रविवारी कांदिवली येथील बॉडी फिट या जिममध्ये मंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते व हे करता करता ती एका ठिकाणी अकाउंट्सची नोकरी देखील करते. हर्षदाने यापूर्वी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत विजय संपादन करून आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

या अजिंक्यपदामुळे पुण्यात ११ व १२ मे रोजी होणाऱ्या भारत श्री २०१९ स्पर्धेसाठी उतरणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात हर्षदाचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे.तिच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे भांडूपचे नाव उंचावले असून भांडुपकरांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे व सर्वत्र तिचे कौतुक होत आहे व तिच्या अभिनंदनाचे फलक भांडुपमध्ये सर्वत्र लावण्यात आले आहेत.

blank