
गोंदिया,दि.27 : महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने येत्या मंगळवारी (ता. २८) रोजी शिर्डी येथील हॉटेल शांतीकमल परिसरात राज्यस्तरीय आदर्श सरपंच तथा उद्योजक पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळय़ात गोंदिया जिल्ह्यातील सरपंचांनी जास्तीत जास्त संख्येत सहभाग घ्यावा असे आव्हान सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कमल येरणे यांनी केले आहे.
प्रसिद्ध पत्रकानुसार या सोहळय़ात महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुक्यातून आदर्श सरपंचाना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्य, पदाधिकारी यांचा शपथविधी व सरपंच सेवा संघाचे स्मरणिका सोहळा पार पडणार आहे. या सोहळय़ाचे स्वागताध्यक्ष म्हणून सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक विजय कुवळेकर, संरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, भूमाता ब्रिगेड संघाचे अध्यक्ष तृप्ती देसाई, आयुक्त चंद्रकांत दळवी, लिज्जत पापड पुणेचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष लाकसेठ दळवी, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील व सरपंच सेवा संघाचे सरचिटणवीस बाबासाहेब पावसे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
या सोहळय़ात महाराष्ट्रातील जवळपास दोन हजाराच्या वर सरपंच उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंचांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, सरपंच फेटा, मॅडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या सरपंच सोहळय़ात गोंदिया जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येत सरपंचांनी सहभाग घ्यावा असे आव्हान जिल्हाध्यक्ष कमल येरणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.




