गडचिरोली,दि.28ः-आशा स्वयंसेविकांना दहा हजार, गटप्रवर्तकांना १५ हजार रूपये मानधन देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात आशा स्वयंसेविकासह गटप्रवर्तकांनी २७ जून रोजी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल मोर्चा व निदर्शने केली. आंदोलना दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांना पाठविण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्याउपाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भाकप नेते डॉ. महेश कोपुलवार, जिल्हासचिव रजनी गेडाम, कविता दरवडे, संगीता मेर्शाम, विद्यादेवी येजूलवार, किरण गजभिये, विजया मोहुर्ले, माया अलाम, कल्पना हुमने, गिता रामटे, अमोल दामले यांनी केले.
निवेदनात म्हटले आहे की, मंत्रालयीन बैठकीत ठरल्यानुसार आशा यांना १0 हजार व गटप्रवर्तकांना १५ हजार रूपये प्रतिमाह मानधन तत्काळ लागू करावा, दिवाळी बोनस म्हणून पाच हजार देण्यात यावे, आशा व गटप्रवर्तक यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे जि.प. सेवेत रिक्त पदावर सामावून घेण्यात यावे, इतर विभागाचे मोबदल्याशिवाय कामे देण्यात येऊ नये, यवतमाळ औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आशांना १८ हजार, गटप्रवर्तकांना २१ हजार किमान वेतन देण्यात यावे, गटप्रवर्तकांना एनएचएम कडून दुचाकी, आशांना साईकल देणे याबाबत त्वरीत निर्णय घेण्यात यावा. संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत जि.प. मध्ये दोन महिन्यातून बैठक बोलाविण्यात यावा, आशा व गटप्रवर्तकांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी आदी मागण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक मागण्या सोडविण्यासाठी लवकरच जि.प.मध्ये संघटनेची बैठक बोलाविण्यात येईल, असे आश्वासन सीईओ राठोड यांनी दिली.





