मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे सारे नेते बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यातील रहिवासी असून चक्क केशरी शिधापत्रिका धारक असल्याचा शोध राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने लावला आहे. आमदार पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी विधान परिषदेत या नेत्यांच्या नावाच्या शिधापत्रिकाच दाखवत एकच खळबळ उडवून दिली. त्यावर या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली.
बोगस शिधापत्रिकांचा राज्यात कसा सुळसुळाट सुरू आहे याचे धक्कादायक उदाहरण देतांना राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील नेत्यांच्या केशरी रंगाच्या शिधापत्रिकाच फुंडकर यांनी सभागृहात फडकविल्या. बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्याच्या तहसीलदाराच्या सही शिक्यानिशी या शिधापत्रिका असून अशाच प्रकारे तब्बल सहा हजार शिधापत्रिका बोगस पध्दतीने तयार करून वाटण्यात आल्या आहेत.





