गोंदिया,दि.15 : राज्यातील घोषीत व अघोषीत विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानाच्या शासन निर्णयाची घोषणा करुन शिक्षकांचे वेतन त्वरीत त्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अन्यथा १७ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक कृती समितीच्या जिल्हा शाखेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या नावे शिक्षणाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, जिल्ह्यातील जवळपास ६00 व राज्यातील २२ हजार शिक्षक गत २0 वर्षांपासून विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळेत बिनपगारी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शाळांना अनुदान देऊन शिक्षकांना शासनाच्या वतीने वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी गत अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र शासनाचे शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी ८ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात शाळाबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याला आज ६ दिवसाचा कालावधीत लोटला असून शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे संघटनेने आपल्या मागणीसाठी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच निवेदनातून, शासनाने राज्यातील घोषीत व अघोषीत विनाअनुदानीत शाळांना अनुदानाचा निर्णय घेऊन शिक्षकांच्या खात्यात १६ ऑगस्टपयर्ंत वेतन जमा करावे, अन्यथा १७ ऑगस्टचा रोजी आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





