वाशिम, दि. ०५ : बालकांचे पहिले १०० दिवस अॅनेमिया, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता, पौष्टिक आहार आदी विषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. याकरिता जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ सप्टेंबर पासून हे अभियान सुरु झाले असून विविध उपक्रमांच्या आयोजनामध्ये वाशिम जिल्हा सध्या राज्यात १५ व्या स्थानी असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी दिली.
२ सप्टेंबर पासून गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्ये बॅनर लावून पोषण विषयी जनजागृती करण्यात येत आहे. ३ सप्टेंबर रोजी गावस्तरावर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व एएनएम यांच्यामार्फत गावांतील गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता व कुटुंबातील इतर महिलांना बालकांचे पाहिले १००० दिवस या विषयावर चर्चा घडवून माहिती देण्यात आली आहे. ४ सप्टेंबर रोजी अंगणवाडी स्तरावर जनजागृती फेरी काढून पोषण आहार विषयक माहिती देण्यात आली, असे श्री. मोहूर्ले यांनी सांगितले.
५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात गाव व अंगणवाडीस्तरावर गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ६ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर आरोग्य विभागाद्वारे तपासणी शिबीर आयोजित करून त्यामध्ये रक्तक्षय असलेल्या गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके यांची तपासणी करून आयएफए टॅबलेट व सिरपचे वाटप केले जाणार आहे.
७ व ८ सप्टेंबर दरम्यान अंगणवाडीस्तरावर समुदाय आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत, तसेच जिल्हास्तरीय विभाग प्रमुख तसेच तालुकास्तरावरील सर्व अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात सभा आयोजित केली जाणार आहे. ९ सप्टेंबर रोजी गावातील कमी वजनाच्या बालकांचे पालक, गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांच्यासमवेत बालकांचे आरोग्य व भविष्यातील परिणामांबाबत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी गाव, तालुका व जिल्हास्तरावर पोषण अभियान विषयी विद्यार्थ्यांची सायकली रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे. १२ सप्टेंबर रोजी गावस्तरावर परसबाग तयार करणे व शेवगा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १३ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर विविध पौष्टिक आहाराचे पाककृती प्रदर्शनाचे आयोजन करून आहाराबाबत विस्तृत चर्चा केली जाणार आहे.
१४ सप्टेंबर रोजी अंगणवाडी केंद्रातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे उंची, वजन मापन करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व एएनएम यांच्यामार्फत कुपोषित बालकांना गृहभेटी देण्यात येणार आहेत. १६ व १७ सप्टेंबर रोजी पोषण घटकांची कमतरता व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन शाळांमध्ये केले जाणार आहे. १८ सप्टेंबर रोजी अंगणवाडी स्तरावर ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या पालकांची, तर १९ सप्टेंबर रोजी शालेय स्तरावर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची पोषण विषयी सभा आयोजित केली जाणार आहे. २० सप्टेंबर रोजी अंगणवाडी स्तरावर योगा दिवस साजरा केला जाणार आहे. २१ सप्टेंबर रोजी अंगणवाडी, ग्रामपंचायत व शाळा स्तरावर हात धुणे व वैयक्तिक स्वच्छतेविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. २२ सप्टेंबर रोजी शेतकरी गटांमार्फत उत्पादित धान्य व शेतमालाचे तालुकास्तरावर प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
२३ व २४ सप्टेंबर रोजी गावस्तरावर ग्रामसंघचे पदाधिकारी व बचत गटांचे पदाधिकारी यांची गरम ताजा आहाराबाबत चर्चा आयोजित केली जाणार आहे. २५ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी बनविलेल्या पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येईल. २६ सप्टेंबर रोजी गावस्तरावर सदृढ बालक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. २७ सप्टेंबर रोजी आकाशावणीवरून पोषण विषयक चळवळ याविषयी मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. २८ सप्टेंबर रोजी गाव, तालुका व जिल्हास्तरावर सर्व अंगणवाडी केंद्र व शाळांमध्ये पोषण प्रभातफेरी काढून पोषण अभियान विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर रोजी तालुकानिहाय पोषण अभियान प्रगतीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर रोजी गाव, तालुका व जिल्हास्तरावर पोषण अभियान प्रतिज्ञा व पोषण महिना समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. मोहुर्ले यांनी कळविले आहे.





