30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ नक्षलवाद्यांशी लढण्यास एकजुटीने उभे राहा-पोलिस अधिक्षक बलकवडे

नक्षलवाद्यांशी लढण्यास एकजुटीने उभे राहा-पोलिस अधिक्षक बलकवडे

0
38

गडचिरोली,दि.06ः- नक्षलवाद्यांसोबत लढण्यासाठी आदिवासी बांधवांनी एकजुटीने व एकदिलाने एकत्र यावे, ग्रामसभांनी नक्षल गावबंदी करावी व नक्षलवाद्यांना विरोध करून गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, नक्षलवाद्यांसोबत लढण्यासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.धानोरा तालुक्यातील पोलिस स्टेशन सावरगाव हद्दीतील कुलभट्टी येथे महाजनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.मेळाव्याला अप्पर पोलिस अधीक्षक मोहीत गर्ग, सीआरपीएफचे ११३ व्या बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ, जि.प. सदस्या लताताई पुंगाटी उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी नक्षलवादी कशाप्रकारे आदिवासी जनतेच्या भोळेभाबळेपणाचा फायदा उठवितात आणि आदिवासींची पिळवणूक करतात याबद्दल नागरिकांना माहिती दिली. यावेळी त्यांनी बेबी मडावी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक युगेंद्र मेर्शाम यांचा दाखला देत नक्षलवादी कशाप्रकारे निष्पाप नागरिकांचा स्वत:च्या फायद्यासाठी खून करतात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित नागरिकांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान करण्याबाबत आवाहन केले.
यावेळी केहकावाही, चव्हेला, कुलभट्टी येथील आदिवासी बांधवांनी रेला नृत्य सादर केले. धानोरा उपविभागांतर्गत येत असलेल्या नक्षल कुटुंबियांना नक्षलमध्ये गेलेल्यांनी आत्मसर्मपण करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रयास उपक्रमांतर्गत गावकर्‍यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशितील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना पाण्याची टाकी, सोलर लाईट, शेतीकरीता उपयोगी फवारणी पंप, इलेक्ट्रीक मोटारपंप, मिक्सर, पेन्डाल साहित्य, सायकल, अपंगांकरीता तीनचाकी सायकल, मच्छरदाणी, भजन वाद्य, बसण्याचे बाक, विद्यार्थ्यांकरीता स्कूल बॅग, महिलांकरीता साडी अशाप्रकारच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गडचिरोली पोलिस दलातर्फे कुलभट्टी येथील नागरिकांना देण्यात आलेले सौरलाईट व मनोरंजन हॉलकरीता देण्यात आलेले टिव्ही व डिशचे उद््घाटन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यास उपस्थित नागरिकांनी पोलिस अधीक्षक बलकवडे यांना कुलभट्टी येथील तलावाचे खोलीकरण करणे, हिरंगे नाल्यावर छोटा पूल बांधणे, कुलभट्टी ते बोधीलखेडा रस्त्यांची डागडूजी करणे, जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी मागणी केली. पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी लवकरात लवकर आपल्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करून त्या पूर्ण केल्या जातील, असे आश्‍वासन उपस्थित नागरिकांना दिले.
मेळाव्यास उपस्थित पोलिस अधिकारी व नागरिकांनी नक्षलवाद्यांनी विनाकारण निघृणपणे खून केलेल्या आदिवासी बांधव व शहीद पोलिस शिपायांच्या स्मरणार्थ दोन मिनीटे मौन पाळून र्शध्दांजली वाहिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ‘आम्ही नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत १00 टक्के मतदान करू’ अशी शपथ घेत ग्रामसभेत नक्षलबंदीचा ठराव घेवू, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षकांना दिले. मेळाव्याला मुरूमगाव, सावरगाव, कटेझरी, ग्यारापती हद्दीतील अडीच ते तीन हजार नागरिक उपस्थित होते.