गोंदिया,दि.09 : जिल्ह्यात शनिवारी (दि.७)रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने आमगाव,सालेकसा आणि गोंदिया तालुक्यात जोरदार हजेरी लावली होती,दरम्यान आज सोमवारला पावसाने उसंत घेतली आहे.या तिन्ही तालुक्यात रविवारला अतिवृष्टीची नोंद झाली.त्यातच संततधार पावसामुळे सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले.संजय सरोवर धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहे.यामुळे बाघनदी व बैनगंगानदी पात्रात या धरणातील पाणी पोचल्याने नदीकाठावरील गावामध्ये पाणी शिरले.गोंदिया तालुक्यातील काटीजवळील,कासा,ब्राम्हणटोला,डांगोरली भागात पाणी शिरल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.तर किन्ही गावाजवळील नदीपात्रात रेतीउपसाचे काम करमारे 4 खासगी इसम पुरात अडकल्याने त्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रेस्कू चमूने सुखरुप बाहेर काढले आहे.धापेवाडा गावाजवळील नदी नाल्यालाही पूर आल्याने जवळील एक टोल्याच्या संपर्क तुटला तर गोंदिया-धापेवाडा मार्ग बंद पडला आहे.भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील लहान पुलावर पाणी चढले आहे.तिकडे बालाघाट-गर्रा मार्गा जवळून वाहणार्या वैनगंगा नदीने रुद्र रुप धारण केले असून नव्या पुलापासून फक्त 5 फूट कमी अंतरावर पाणी आहे.

आत्तापर्यत जिल्ह्यात 973.94 मीमी पावसाची नोंद झाली असून 83 टक्केवारी आहे. पावसामुळे आमगाव शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पावसामुळे किडंगीपार-शिवणी,किंडगीपार-जवरी,बोथली-ठाणा, भजेपार-अंजोरा, चिचटोला-धानोली, घाटटेमणी-कामठा या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पावसामुळे या तिन्ही तालुक्यात घरांची सुध्दा पडझड झाली असून महसूल विभागाने सर्वेक्षणास सुरूवात केली आहे.पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले.तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण ओव्हर फ्लो झाले असून या धरणातून १ फूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.लगतच्या मध्यप्रदेशात सुध्दा मुसळधार पाऊस सुरू असल्याने संजय सरोवर धरणाचे ६ दरवाजे ६ फुटाने उघडण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.




