कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी घ्यावी तातडीची बैठक;जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे निवेदन
गोंदिया,दि.१३ : गोंदिया जिल्ह्यात सध्या कॉंग्रेस पक्षातील बड्या नेत्यांचे पक्षबदलाचे वारे जोरात सुरू आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्वसामान्य आणि निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्ते गोंधळाच्या स्थितीत आहेत. दुसरीकडे मात्र जिल्हा कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी भ्रमणध्वनी आणि व्यक्तीश: संपर्क करून कार्यकर्त्यांना पक्षबदलासाठी संपर्क करत आहेत. सामान्य कॉंग्रेस कार्यकर्ते मात्र आजही कॉंग्रेस सोबतच आहे. सध्या निवडणूकीचा काळ असल्यामुळे पक्षातील काही बडे नेते आणि पदाधिकारी त्यांची पक्षबदल करण्याकरिता दिशाभूल करत असल्यामुळे संभ्रमाच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात आहेत. ही परिस्थिती रोखण्याकरिता कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभा आज(दि.१३) पार पडली. या बैठकीत जिल्हा कॉंग्रेसची तातडीची बैठक आयोजित करण्यात यावी, यासंदर्भात एकमताने लेखी पत्र कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे यांना देण्यात आले. याची सूचना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले. शुक्रवारी(ता.१३) प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवेदन करण्यात आले की, अनिश्चिततेच्या काळात कुणीही खचून न जाता आणि कुणाच्याही दबावाला बळी न पडता पक्षासोबत उभे राहावे. कुणाच्या पक्ष सोडून गेल्यामुळे पक्षावर फरक पडणार नसून यापूर्वी देखील पक्षाने अशी स्थिती अनुभवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भूलथापांना बळी न पडता पक्षाशी आजपर्यंत एकनिष्ठ होते, तसेच राहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अॅड. के. आर. शेंडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव विनोद जैन, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, प्रदेश सचिव अमर वराडे, जिल्हा सेवादल अध्यक्ष पन्नालाल शहारे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, जिल्हा कॉंग्रेस प्रवक्ता अनिलकुमार गौतम, जिल्हा मागासवर्गीय कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल शेंडे, प्रदेश माजी महासचिव विजय बहेकार, प. स. सदस्य योगराज उपराडे, जिल्हा कॉंग्रेस प्रतिनिधी अॅड. पृथ्वीराज चौहाण, जिल्हा उपाध्यक्ष पी. जी. कटरे, गोरेगाव तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, पं. स. सदस्य ओमप्रकाश भक्तवर्ती यांची उपस्थिती होती.





