गोंदिया, दि. 14: पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.यावेळी जि.प. समाज कल्याण समिती सभापती विश्वजित डोंगरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती मंगला कटरे, साकोली येथील वर्मा ट्रॅक्टर्सचे संचालक मोहित वर्मा, महिंद्रा कंपनीचे अधिकृत विक्रेते प्रकाश रहांगडाले, आयशर कंपनी प्रतिनिधी संदीप काळबांधे यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी बचत गटांचे सदस्य उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये ९० टक्के शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहाय्यता बचत गटाचा हिस्सा असतो. शासनामार्फत कमाल ३ लक्ष ५० हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान दिले जाते.
पालकमंत्री डॉ. फुके यांच्या हस्ते गोंदिया तालुक्यातील बघोली येथील आधार स्वयंसहाय्यता महिला समूह बचत गट, भिमाई स्वयंसहाय्यता महिला समूह बचत गट, स्वाती महिला समूह बचत गट, उपासना महिला समूह बचत गट, निसर्ग स्वयंसहाय्यता बचत गट, काटी येथील लुंबिनी स्वयंसहाय्यता समूह, तेढवा येथील त्रिशरण स्वयंसहाय्यता महिला समूह बचत गट, अंभोरा येथील खुशहाली महिला बचत गट, तिरोडा तालुक्यातील बडेगाव येथील यशोधरा महिला बचत गट, आमगाव तालुक्यातील माल्ही येथील सिद्धार्थ महिला बचत गट या १० स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिल वाळके यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रदीप ढवळे यांनी केले, तर आभार लक्ष्मण खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक सतीश वाघ, सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी व क्रिस्टल कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घेतले.





