भंडारा,दि.17ः-
रोजगार निर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री प्रामाणिक असतील तर महाराष्ट्रात विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी जाहीर करावी. देशातील एकूण रोजगार निर्मितीपैकी एकट्या महाराष्ट्रात २५ टक्के रोजगार निर्मिती झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत केला आहे. या दाव्यावर टीका करत रोजगाराच्या आकड्यांबाबत विपर्यास करून मुख्यमंत्री एकप्रकारे जनतेसोबत धादांत खोटे बोलत आहेत, असा गंभीर आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला.भंडार्यात सोमवारी एनएसयूआय व युवक काँग्रेसची बेरोजगार यात्रा काढण्यात आली, त्यावेळी बेरोजगार युवकांना संबोधित करताना ते बोलत होते.
भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील ६ लाख उद्योग बंद पडले असून, त्यात महाराष्ट्रातील सुमारे १ लाख ४१ हजार उद्योगांचा समावेश आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातील औद्योगिक वसाहतींमध्येही निराशाजनक वातावरण आहे. अशोक लेलॅंड, महिंद्रा, पारले सारख्या नावाजलेल्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. महाराष्ट्रात लाखो कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे.
मुख्यमंत्र्यांनी २0१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेली २४ हजार शिक्षकांची आणि ७२ हजार शासकीय पदांची मेगाभरती दीड वर्षानंतरही पूर्ण झालेली नाही, याचेही स्मरण त्यांनी करून दिले. निवडणुकीच्या तोंडावर काही पदांची भरती करून आणि जाहिराती प्रकाशित करून किंवा मुलाखतींची प्रक्रिया जाहीर करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिस भरतीतही सरकारने मोठा अन्याय केला आहे. पोलिसांच्या १३ हजार जागा भरणार असल्याचे सांगून केवळ तीन हजार पदांचीच जाहिरात काढण्यात आली. या जाहिरातीत ओबीसींच्या जागाच नाहीत. अशाप्रकारे ओबीसींवर मोठा अन्याय झाला असल्याचे नाना पटोले म्हणाले.
एनएसयूआय व युवक काँग्रेसची बेरोजगार यात्रा भंडारा येथील शास्त्री चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय चौक येथे सांगता झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी खासदार नाना पटोले, आमिर शेख, माजी आमदार सेवक वाघाये, आनंदराव वंजारी, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, महेंद्र निंबार्ते, प्रमोद तितिरमारे, जिया पटेल, विकास राऊत, प्रकाश पचारे, संदीप रहांगडाले, सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक, आकाश कवाडे, शुभम गभणे, पवन वंजारी, शुभम साठवणे, राकेश कारेमोरे, रमेश पारधी, पूजा ठवकर, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, प्यारेलाल वाघमारे, सचिन घनमारे, मुकुंद साखरकर, सचिन फाले, विवेक गायधने, चंद्रकांत निंबार्ते, रमेश खराबे, सुरेश मेर्शाम, सीमा भूरे, अमर रगडे, डॉ. पंकज कारेमोरे, गौरीशंकर मोटघरे, अरविंद कारेमोरे, भूषण टेंभूर्णे, शाहीन मून, शमीम शेख, कुंदा वैद्य, बालू ठवकर, विष्णु रणदिवे, जयश्री बोरकर, प्रफुल्ल बिसने, शैलेश पडोळे, मोहन निर्वाण, प्रशांत वाघाये, आकाश कवाडे, साहिल मेर्शाम, नरेश करंजेकर, सचिन कुंभरे, अमित लांजेवार, आकाश बोंद्रे, सुरेंद्र चिंदालोरे, दिनेश धावळे, सुरेश तितीरमारे, शुभम वैद्य, प्रितेश गायधने आदी उपस्थित होते.





