25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ केशोरीवासीय टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

केशोरीवासीय टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

0
53

केशोरी राशन दुकान प्रकरणी गावकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

सुभाष सोनवाने

चिचगड,दि.18- देवरी तालुक्यातील केशोरी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या केशोरी, निलज आणि खामखुर्रा गावातील नागरिकांनी रेशन धान्याची अफरातफर करणाऱ्या शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांवर कार्यवाही न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयीचे निवदेन गेल्या 10 सप्टेंबर रोजी चिचगडच्या दौऱ्यावर आलेले गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांना देण्यात आले. या विषयीचे पत्र गोंदियाचे जिल्हाधिकारी, आमदार संजय पुराम यांचेसह प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, केशोरी येथील सरपंच ह्या गावात वास्तव्य करीत नसून सुद्धा दुकानदार हा त्यांचा कार्यकर्ता असल्याने गेल्या वीस वर्षापासून रेशनचे वाटप व्यवस्थितरीत्या करीत असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर असे की, केशोरी येथील स्वस्त धान्य दुकानदार कु. महानंदा देवा घरत याने शिधापत्रिकाधारकांना शासकीय नियमाप्रमाणे धान्याचे वाटप न करता त्या मालाची परस्पर विल्हेवाट केल्याची तक्रार लाभार्थ्यानी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे गेल्या वर्षी केली होती. याव्यतिरिक्त विविध योजनांखाली पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवत केवळ 2 अंत्योदय, बीपीएल 35 आणि सामान्य शिधापत्रिकाधारक 10 असल्याचे दर्शविले. परिणामी, पात्र असूनही अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहिले. याविषयीची तक्रार गावकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक आमदार संजय पुराम यांचेकडे केली. याविषयी देवरीचे पुरवठा अधिकारी श्री. अगडे यांनी चावडी वाचन करून प्रत्यक्षात अंत्योदय 98 व बीपीएल 102 आणि इतर 6 लाभार्थी संबंधित धान्य दुकानदाराला जोडले असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. असे असताना सुद्धा त्या स्वस्त धान्य दुकानदारावर अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासंबंधी गावकऱ्यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही त्या दुकानदाराला पाठीशी घातले जात आहे.
कु. घरत या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्या असल्याने राजकीय दबावापोटी अधिकारी कारवाई करण्यापासून घाबरत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, नवनिर्मित चिचगड येथील तहसील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना संबंधित धान्यदुकानदारासह कार्यवाही न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही करण्यासंबंधी निवेदन दिले. या निवेदनानंतर सुद्धा संबंधित दुकानदाराला राजाश्रय देण्यात आला तर केशोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गावामधील मतदार हे आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा केशोरी वासीयांनी सरकारसह प्रशासनाला दिला आहे.